पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मनपाकडून नाट्य परिषदेच्या जागेचा विषय मार्गी


नांदेड ः
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांनी यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या सूचनेनुसार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची प्रक्रिया नांदेड-वाघाळा मनपाच्या नव्या महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी सुरू केली आहे.
येवनकर यांची गेल्या मंगळवारी महापौरपदी निवड झाली. तत्पूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मनपातील पक्षाचे सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांना नाट्य परिषदेच्या जागेच्या मागणीची पूर्तता करा, असे सांगितले होते. 2017च्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नाट्य परिषदेच्या उपक्रमांसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नव्या महापौरांच्या दालनात या विषयावर बुधवारी झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ.सुनील लहाने व अन्य संबंधित हजर होते.
नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या वरच्या मजल्यावरील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती या बैठकीत केल्यानंतर काल मनपा व नाट्य परिषदेच्या प्रतिनिधींनी प्रस्तावित जागेची संयुक्तपणे पाहणी केली. त्यानंतर या संदर्भात पुढील प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे ठरले. या पाहणी दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर हजर होते. या जागेत आवश्यक त्या व्यवस्था करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
जागा देण्यासंदर्भातील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मनपाची महिला व बालकल्याण समिती व नाट्य परिषद यांनी संयुक्तपणे वेगवेगळे उपक्रम राबवावेत, असे महापौरांनी सुचविले. त्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.
वरील बैठकीस मनपाचे नगरसचिव अजितपालसिंघ संधू, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नाथा चितळे, यांच्यासह स्थानिक शाखेच्या वतीने निमंत्रक संजीव कुळकर्णी, अध्यक्ष सौ.अपर्णा नेरलकर, कार्यवाह गोविंद जोशी, तसेच माजी नगरसेवक विजय येवनकर, हृषीकेश नेरलकर, संतोष कुलकर्णी प्रभृती हजर होते. नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी काँग्रेस नेते तसेच नांदेड मनपाचे आभार व्यक्त केले आहेत. परिषदेच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्ष अपर्णा नेरलकर यांनी नूतन महापौर मोहिनी येवनकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *