नांदेड-
जिल्ह्यातील शाळांना दुर्बल घटकातील इयत्ता पहिली ते चौथीमधील मुलींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता उशिरा प्राप्त झाल्याने अखेर उपस्थिती भत्त्याचे सर्व शाळांतून वाटप करण्यात आले. तसेच उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे धान्यही काही शाळांना मिळाले नव्हते. शेवटच्या टप्प्यात सर्व अप्राप्त शाळांना धान्य मिळाले आहे. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटीव्ह कंझ्युमर्स फेडरेशनकडून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्यादी व तांदूळ माल व मुलींच्या उपस्थिती भत्त्याचे वाटप जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या उपस्थितीत सुरक्षित वावराचे नियम पाळून वाटप करण्यात आले.
शाळेतील दैनंदिन उपस्थितीबाबत दररोज एक रुपया या प्रमाणे गतवर्षीच्या उपस्थितीवरुन पात्र लाभार्थी असलेल्या विद्यार्थिनींना या उपस्थिती भत्त्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष बाबुमियाँ शेख, मंचकराव शिखरे, भीमराव गोडबोले, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, भानुदास शिखरे, पांडूरंग गच्चे, अंकुश शिखरे, रतन टिमके, व्यंकटी तेलंग, शिवाजी शिखरे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील शाळांना उन्हाळी सुट्टीतील एकूण ३४ दिवसांचा तांदूळ, हरभरा आणि मूगदाळ यांची सीलबंद पाकिटे असा आहार पटसंख्येच्या प्रमाणात प्राप्त झाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी तीन किलो चारशे ग्रॅम, मूगदाळ सहाशे ग्रॅम, हभरा एक किलो दोनशे ग्रॅम असे प्रमाण आहे तर सहावी ते आठवीतील उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी तांदूळ पाच किलो शंभर ग्रॅम, मूगदाळ नऊशे ग्रॅम, हरभरा एक किलो आठशे ग्रॅम अशा प्रमाणात सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हा १५ मार्च ते १५ एप्रिल पर्यंतचा शालेय पोषण आहार यापुर्वीच वाटप करण्यात आला आहे. तसेच शिल्लक मालापैकी खाण्यायोग्य मसुरदाळ, वाटाणा, हरभरा, मटकी या कडधान्यासह मसाला, मीठ, हळद, जिरे, मोहरी, सोयाबीन तेल आदी जिन्नसही समप्रमाणात नुकतेच वाटप करण्यात आले. यानंतरही पाकिटांच्या स्वरुपातच शालेय पोषण आहार देण्यात यावा अशी मागणी पालकांतून होत आहे.