नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृतीवर भर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई;

देश स्वतंत्र झाल्यापासून शैक्षणिक धोरणांमध्ये अनेकदा नवनव्या संकल्पना राबविल्या गेल्या. समग्र अशा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीयत्वावर आणि भारतीय नितीशास्त्रावर भर देताना संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

देशातील जुन्या व प्रतिष्ठित पंजाब विद्यापीठाने गुरुवारी (दि. २४) आयोजित केलेल्या नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अंमलबजावणीसाठी रोडमॅप’ या विषयावरील चर्चासत्राचे राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.

नैतिक मूल्ये हा शिक्षणाचा मूलाधार असतो. नैतिक मूल्ये, आचार-विचार व चारित्र्य निर्माण ही मूल्ये जपली गेली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणाने माता, मातृभाषा व मातृभूमी या विषयांवर भर दिला आहे. शिक्षण केवळ रोजगार मिळवून देणारे नसावे तर चारित्र्यवान नागरिक घडविणारे असावे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारताने जगाला ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:’ हा वेदविचार दिला. नव्या धोरणामुळे जगभरातील उत्तमोत्तम विद्यापीठे भारतात केंद्र सुरू करू शकतील असेही त्यांनी सांगितले.

आंतरशाखीय तसेच बहुशाखात्मक शिक्षणाला महत्त्व देणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवसंकल्पना नवोन्मेष संशोधन व गहन विचार यांना चालना देणारे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय व्हावा तसेच विविध तज्ञ समितींच्या माध्यमातून धोरणाचे सूक्ष्म अध्ययन व्हावे अशी सूचना आपण राष्ट्रपतींनी या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी होताना केली असल्याचे श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राज कुमार यांनी प्रास्ताविक केले तर विद्यापीठ उपयोजित व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख उपासना जोशी-सेठी यांनी चर्चासत्राबाबत माहिती दिली.

#CMOMaharashtra #BhagatSinghKoshyari #narendramodi_primeminister

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *