नांदेड-दिगांबर वाघमारे
संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे घरपडी, जनावरे दगावणे यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत या मागणीसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून मुखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर यांनी आज जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी शेतीच्या सरसकट पंचनाम्याची मागणी केली.
मुखेड तालुक्यातील कापूस, तूर, सोयाबीन, ऊस, मुग, उडीद, ज्वारी व केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन जवळ जवळ वायाच गेले आहे. अशावेळी या सर्व पिकांचे पंचनामे करणे गरजेचे आहे. त्यासोबतच ज्या शेतकर्यांनी पिक विमा भरला आहे. अशा शेतकर्यांना पिक विमा कंपन्याकडून तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून सर्व पिकांचे सर्वेक्षण करण्यात यावे.
शेती सोबतच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची जनावरे दगावली आहेत. अनेक गावामध्ये घरपडी झाली आहे. शेतकरी या भयान परिस्थितीमुळे रस्त्यावर आला आहे. अशावेळी तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी विनंती माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांना केली.
माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर यांनी घेतलेल्या जिल्हाधिकार्यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्या समवेत जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीव पा.बेटमोगरेकर, माजी जि.प.सदस्य बाबूराव गीर्हे, अखिल येवतीकर, माधवराव बोडके, माजी सरपंच गिरी महाराज, राजकुमार नागरगोजे, प्रमोद किशोर सावळे, भारत भोसले आदिंची उपस्थिती होती.