नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

“माझे कुटूंब माझी जबाबदारी” आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनातर्फे सादरीकरण

नांदेड ;

कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी शासन पातळीवरुन जिल्हा प्रशासनाने “माझे कुटूंब माझी जबाबदारी” मोहिम कल्पक व प्रभावीपणे राबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेंतर्गत लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. एखाद्या कुटूंबात कुणाला आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा सल्ला दिला तर त्याला ही प्रक्रिया सहज आणि सुलभ लक्षात यावी व याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधोपचार देता यावीत यासाठी एक कल्पक कीट तयार करण्यात आले. या कीटचेही त्यांनी कौतुक करुन इतर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नबाब मलिक, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विशेष पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आदी अधिकारी उपस्थित होते.

नांदेड जिल्हा प्रशासनाची सर्व टिम परस्परांशी योग्य समन्वय राखत कोविड-19 च्या या काळात अतिशय चांगले काम करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्यादृष्टीने ऑक्सीजन वाहतुकीसाठी टँकरची उपलब्धी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेवा-सुविधा विस्तारासाठी करावे लागणारे नियोजन याकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहमती दर्शविली. याबाबत तातडीने हा प्रश्न मार्गी लावू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा असून त्याप्रमाणात आव्हाने जास्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या आव्हानावर यशस्वी मात करता येणे जिल्हा प्रशासनाला सुकर झाले असून “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेंतर्गत गृहविलगीकरणासाठी आरोग्याच्यादृष्टिने एक परिपूर्ण अशी कीट तयार करण्यात आली असून ज्या व्यक्तींना वैद्यकीय टिमने विलगीकरणासाठी सूचविले आहे अशा व्यक्तींना ही किट दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. या कीटमध्ये मास्क, गृहविलगीकरण मार्गदर्शीका, अत्यावश्यक औषधे, डेटॉल साबण आदी साहित्य ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात या मोहिमेत अधिकाधिक सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्याचे नियोजन केले असून लोककला, पारंपारिक कला यांचा आरोग्य साक्षरतेसाठी प्रभावी उपयोग करु असे ते म्हणाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, डॉ. शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

#Nanded #CMOMaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *