कवी – शांता शेळके
कविता – हे विश्व प्रेमिकांचे
शांता जनार्दन शेळके (उर्फ शांता शेळके).
जन्म – १२/१०/१९२२ (इंदापूर, पुणे).
मृत्यू – ०६/०६/२००२ (पुणे (वय वर्षे ७९).
प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री, प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका आणि पत्रकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व.
साहित्य, पत्रकारीता, राजकारण, चित्रपट, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात शांताबाईंनी काम केलं असलं तरी कविता साहित्यावर त्यांचे नेहमीच विशेष प्रेम राहिलं आहे. कवितेतील हळुवारपणा आणि भावनिकता जोपासत भावगीते, भक्तीगीते, नाट्यगीते, चित्रपट गीते, कोळीगीते, बालगीते, प्रासंगीक गीते अशा विविध रुपात त्यांनी कविता केल्या. सुरवातीला माधव ज्युलियन यांचा त्याच्या कवितांवर मोठा प्रभाव होता. १९७१ मध्ये त्यांचा “गोंदण” हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्यातून त्यांच्या कवितांना नवीन चेहरा मिळाला. अंतर्मुख, चिंतनशील, प्रगल्भता, आठवणी, वैफल्य, प्रेम, हुरहुर, स्रुष्टीची गुढता असे अनेक भावतरंग आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये दिसतात.
शांताबाईंनी वृत्तबद्ध कविता लिहिल्या, सुनीते, मुक्तछंद, बालगीते अशा विविध स्वरूपात कविता लेखन केले. वृत्तबद्ध कविता लेखनामुळे त्यांच्या कविता या गेय स्वरुपाच्या आहेत आणि त्यातील बहुतांश कवितांची पुढे प्रसिद्ध गाणी नाट्यगीते, चित्रपटगीते झाली.
बी.ए.ला पहिल्या वर्षीच १९४१ मध्ये त्यांची पहिली कविता “शालापत्रक” प्रकाशित झाली. आणि तीची विशेष दखल घेतली गेली.
“रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी” यासारखी लावणी लिहिणाऱ्या शांताबाई मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत्या.
प्रा.अशोक बागवे यांच्या सारखे अनेक प्रतिभावंत कवी, साहित्यिक हे त्यांचे नशीबवान विद्यार्थी होत.
गोंदण, एक गाणे चुलीचे, कविता विसाव्या शतकाची, कविता स्मरणातल्या, जन्म जान्हवी, तोच चंद्रमा, पुर्वसंध्या, रुपसी अशा त्यांच्या जवळपास १०० च्यावरती साहित्यकृती (कविता संग्रह, ललित, अनुवाद) प्रकाशित झाले आहेत.
विकल मन आज झुरत…
जय शारदे वागेश्वरी…
पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश…
ऋतू हिरवा ऋतू बरवा…
का धरीला परदेश…
काटा ऋते कुणाला…
काय बाई सांगू…
गजानना श्री गणराया…
टप टप टाकीत टापा…
तोच चंद्रमा नभात…
दाटून कंठ येतो…
पप्पा सांगा कुणाचे..
मी डोलकर डोलकर
अशा अनेक गाजलेल्या अजरामर कलाकृती शांता बाईंनी आपल्याला पुढच्या पीढीला ठेवा म्हणून दिलेल्या आहेत. रसिकांनीही शांताबाईंच्या साहित्यावर आणि कलाकृतींवर भरभरून प्रेम केलं, आजही करतात.
शांता बाईंच्या अशा चतुरस्त्र कार्याची दखल घेऊन अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले –
ग.दि.मा. गीत लेखन पुरस्कार १९९६.
सुर सिंगार पुरस्कार (पुढे उभा मंगेश…).
केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग).
साहित्यातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार २००१
असे अनेक विविध मानांकीत पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.
त्यांच्या अनेक गाजलेल्या कवितांपैकी “हे विश्व प्रेमिकांचे” ही एक कविता.
प्रेम कसं असावं, दूर राहूनही ते कसं छान जपावं, विरहातही आनंदी रहावं हा साधा सरळ संदेश कोणतीही कृत्रिमता न आणता सोप्या शब्दांमध्ये शांताबाईंनी आपल्या समोर मांडला आहे.
प्रेमी जवळ आल्यावरही ओठ मूक अबोल व्हावेत. आणि शब्दातून काही न सांगताच मनातलं सारं समजावं. प्रत्यक्ष भेट झाली नाही, मिलन झालं नाही, तरीही विरहातही सुखाचा आनंद आहे, एवढी प्रेमात ताकद आहे.
प्रेमातला राग हा फसवा आहे, रुसव्यातही प्रीती आहे. हा क्षणिक राग लगेच निघूनही जातो. दिवस रात्र एकमेकांचा विचार केला कौतुक केलं तरीही आनंद मिळतो.
प्रेमात दोघांमध्ये कधीच दुरावा नसावा. अन स्पर्शाविना सुद्धा जीव मोहरून यावा. आणि चेहऱ्यावर प्रेमाचे सार्थक झाल्याचे गोड स्मित उमटावे.
असे जगावेगळे प्रेमिकांचे विश्व असते. असे प्रेमतील विश्वाचे सुंदर विचार शांताबाईंनी आपल्या कवितेत व्यक्त केले आहेत.
चला तर मग या कवितेचा प्रत्यक्ष आनंद घेऊ –
हे विश्व प्रेमिकांचे
असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे
शब्दांविना परंतू बोलून सर्व जावे
अतृप्त मीलनाचे, विरहातही सुखाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !
फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती
होता क्षणिक दूर वेडी मनात भीती
दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !
दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा
ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !
◆◆◆◆◆
- शांता शेळके
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■