फुलवळ ; धोंडीबा बोरगावे
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे सर्व अंगणवाडी केंद्रातील सेविका , मदतनीस यांनी एकत्रित येऊन वरिष्ठांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत पोषण माह यशस्वीरित्या संपन्न केला.
एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत ७ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण माह साजरा करणे आवश्यक होते.
त्यानुसार आज किशोरवयीन मुली , गरोदर माता आणि अंगणवाडीतील बालकांच्या पालकांना समुपदेशन करणे , किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढवणे , फॉलिक ऍसिड च्या गोळ्या व सकस आहार वेळेवर घेणे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. गरोदर मातांना पण सकस आहार , फॉलिक ऍसिड च्या गोळ्या वेळेवर घेणे व वेळीच जवळच्या अंगणवाडी केंद्रात नाव नोंदणी करणे याबद्दल माहिती देण्यात आली. तर अंगणवाडी मधील ० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन , उंची घेऊन ग्रेड तपासणे आणि आहार व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपापले घर , परिसर स्वच्छ ठेवून मोकळ्या जागेत परसबाग तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षिका सी जी पोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका शोभाबाई डांगे , गोरीबी शेख , संगीता जोंधळे , सुभद्राबाई फुलवळे , वंदना मंगनाळे तर मदतनीस सुनीता शेकापुरे , कालिंदा गोधने , नंदिनी बसवंते , महानंदा देवकांबळे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रला अंगणवाडीतील बालकासह पालक , किशोरवयीन मुली , गरोदर माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.