नांदेड-
राष्ट्रपिता म. गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त जवळा देशमुख येथील जि. प. शाळेत विविध उपक्रम राबवून १५० व्या जयंतीपासून आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या तसेच आॅफलाईन असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पोषक अशा शिक्षक मित्र उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच ग्यानोबा टिमके, उपसरपंच पुंडलिक जाधव, सहशिक्षक संतोष घटकार, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गोडबोले, मारोती चक्रधर यांची उपस्थिती होती.
महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फेब्रुवारीत शालेय बालसभा आणि आॅनलाईन पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात काव्यस्पर्धा, गांधी संवाद, सुविचार स्पर्धा, गांधीवादी विचार संमेलन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांनी पुढाकार घेतला होता. शाळांच्या संदर्भात लाॅकडाऊनमध्ये सवलत मिळाल्यानंतर सदरील विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक ढवळे यांनी सांगितले.
गावातील उच्च शिक्षित तरुणांनी स्वेच्छेने शिक्षक मित्र उपक्रमात सहभागी होऊन काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या सूचनेनुसार गांधी जयंतीचे औचित्य साधून मुख्याध्यापक ढवळे जी.एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चार ते पाच विद्यार्थी विद्यार्थिनींचे गट तयार करून त्या गटांसाठी शिक्षक मित्र म्हणून नऊ जणांची निवड केली. शिक्षक मित्र म्हणून कविता गोडबोले, साहेब गोडबोले, विनोद गोडबोले, विश्वदिप गोडबोले, शितल पांचाळ, रवी गच्चे, रत्नदिप गच्चे, समाधान लोखंडे, अविनाश हिंगोले हे परिश्रम घेत आहेत.