नांदेड –
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त भावसार चौकातील ज्ञानोबा नरवाडे, तरोडा नाका कामगार चौकातील येथील राजेश लोकरे व सिद्धार्थ नगर, कॅनाल रोडवरील बाबुराव थोरात यांचा सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, अक्षरोदय साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष शरदचंद्र हयातनगरकर, दिनकर शेजुळे, मयुर वाठोरे, प्रतिक भारदे यांची उपस्थिती होती.
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन म्हणून माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवसानिमित्त ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा होत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस आहे.
वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षाही सप्तरंगी साहित्य मंडळाने व्यक्त केली. इमानेइतबारे व्यवसाय करणारा ह घटक तसा उपेक्षित राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. काही जणांची तिसरी, दुसरी पिढी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात आहेत. वडील, मुलगा आणि नातवंडे असे तीन पिढ्या व्यवसायात आहेत.
विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, पेन्शन योजना लागू करावी, एसटी महामंडळाचा पास मिळावा, प्रत्येक जिल्ह्यात भवन बांधण्यासाठी जागा, सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपघात विमा उतरविला पाहिजे या काही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. वृत्तपत्र विक्रेता हा घटक दुर्लक्षित आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. काहीजण वृत्तपत्र विक्रेत्यांचा ‘एकेरी’उल्लेख करतात.
तर काहीजण आदरही करतात. प्रामाणिकपणाने काम करणारा हा वर्ग आहे. या घटकाकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी साहित्य मंडळाने शाल, पुष्पहार , ग्रंथभेट देऊन वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमासाठी नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव रुपाली वैद्य/वागरे, रणजित गोणारकर यांनी परिश्रम घेतले.