नांदेड –
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त जवळ्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस शाळाशाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रशासनाच्या सूचनेनुसार जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉ. कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी धूपपूजन केले. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले यांची उपस्थिती होती.
शालेय बालवाचनालयातील पुस्तकांचे यावेळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले होते. सद्या शाळा सुरु नसल्याने विद्यार्थ्यी शाळेत येत नाहीत. त्यामुळे अवांतर पुस्तक वाचनाकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. आॅनलाईन पद्धतीने शिक्षण चालू असले तरी दिवसभरात कोणत्याही विद्यार्थ्यांना सवडीनुसार शाळेत येऊन आवडीनुसार कोणतेही पुस्तक घेऊन वाचन करण्याची मुभा देण्यात आली होती. यावेळी बोलताना ढवळे जी.एस. म्हणाले की, वाचन संस्कृती वाढीस लागण्याकरिता शिक्षक व पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. पुस्तक वाचनाने बुद्धी व मन यांचा विकास होतो. या उपक्रमासंबंधाने एकत्रित होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी कोव्हिड- १९ संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.
तसेच जागतिक हात धुणे दिवसानिमित्त हात धुण्याच्या विहित पद्धतीने कसे हात धुवावे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी नंदिनी वाघमारे, अक्षरा गोडबोले, साक्षी गोडबोले, शुभांगी गोडबोले या विद्यार्थ्यांनीनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. वाचन प्रेरणा दिवस आणि जागतिक हात धुणे दिवस हे दोन्ही कार्यक्रम साजरे करण्यासाठी शिक्षक मित्र रत्नदीप गच्चे, रविकांत गच्चे, वैभव गोडबोले, विनोद गोडबोले, अविनाश हिंगोले, समाधान लोखंडे, हैदर मामू, मारोती चक्रधर, कमलाबाई गच्चे यांनी परिश्रम घेतले.