नांदेड –
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी शिक्षक साहित्यिक मंचाच्या वतीने हिमायतनगरचे नूतन गटशिक्षणाधिकारी प्रदीप सुकाळे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील शिवरोड परिसरात असलेल्या सप्तगिरी काॅलनी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलतांना सुकाळे म्हणाले की, खरे शिक्षक हे इतरांच्या आनंदातच आपला आनंद शोधत असतात. आत्ताच्या संकटकाळातही शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी प्रयत्नरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातच शिक्षकांचा आनंद लपलेला असतो असे ते म्हणाले. यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक गंगाधर ढवळे, एकंबाचे मुख्याध्यापक पांडुरंग कोकुलवार, सहशिक्षक नारायण गायकवाड, शंकर गच्चे, वैशाली कांबळे, कैलास धुतराज, साहेबराव कांबळे, विकास भालेराव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सारीपुत्र चावरे यांनी केले. तसेच सर्वांना गटशिक्षणाधिकारी सुकाळे यांचा थोडक्यात परिचय करून दिला. सुकाळे सरांना अध्ययन अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आता सर्व तालुक्याला होणार आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या कारकिर्दीत ते आपल्या तालुक्याचे नाव नक्कीच उंचावतील. अशा प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी जि.प.प्रा.शा. वायवाडीचे प्राथमिक पदवीधर शिक्षक शंकर गच्चे यांनी सर्व साहित्यिक मित्र तथा शिक्षकांचा थोडक्यात परिचय करून दिला.
या सन्मान सोहळा प्रसंगी या सन्मान प्रसंगी सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी सुकाळे म्हणाले की आपल्या सत्काराचा आपल्या सदभावनांचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करतो. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद व्यक्त करणे ही फार मोठेपणाची गोष्ट असते. या सत्कारासाठी मंचाचे नागोराव डोंगरे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, मारोती कदम, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर,शिवाजी सावते यांनी शिक्षक साहित्यिक मंचाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. शेवटी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पांडुरंग कोकुलवार यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.