नांदेड ;
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने श्रीगुरुजी रुग्णालयात सुरू असलेला लॉयन्सचा डबा या उपक्रमासाठी अन्नदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आगामी दोन वर्षाची अग्रीम नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
गरजू रुग्णांना मदत मिळावी या उद्देशाने लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने 100% लोकसहभागातून रयत रुग्णालय व श्रीगुरुजी रुग्णालयात लॉयन्सचा डबा हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात येतो. यासाठी अन्नदात्यांनी सहकार्य करावे आवाहन प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून करण्यात आले होते. रयत रुग्णालयात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतची नोंदणी पूर्वीच पूर्ण झाली होती. श्री गुरुजीसाठी 1 जून 2020 ते 31 मे 2022 पर्यंतचे सर्व 730 दिवसाची अग्रिम नोंदणी आता पूर्ण झालेली आहे.
या दोन्ही रुग्णालयात प्रत्येक दिवशी अन्नदात्यांच्या हस्ते डबे वाटप करून समाजमाध्यमाच्या मार्फत पंचवीस हजार नागरिकापर्यंत माहिती दिली जाते. कोण कोणत्या दिवशी डबे देणार आहेत याची माहिती दर्शविणारा फलक संबंधित रुग्णालयात लावण्यात येतो.लॉयन्सचा डबा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी,झोनल चेअरमन लॉ.डॉ. विजय भारतीया व लॉ. योगेश जैस्वाल, सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे , कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, लॉ. शैलेश पाटणुरकर,स्वयंसेवक राजेशसिंह ठाकूर, मन्मथ स्वामी, हनुमंत येरगे हे परिश्रम घेत असतात. दानशूर नागरिकांनी दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.