नांदेड –
येथील विद्रोही युवा मंचच्या वतीने कवयित्री पुजा मेटे स्मृतिदिनानिमित्त शहरातील बेलानगर परिसरात विद्रोही कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनापुर्वी पुजा मेटे स्मृतिकाव्याभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही कवयित्री पुजा ढवळे तर प्रमुख अतिथी म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे महासचिव पांडूरंग कोकुलवार, समीक्षक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. तर कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात लेखिका रुपाली वैद्य वागरे होत्या तर नवोदित अतिथी कवयित्री म्हणून शीतल भोरगे, नेहा हनमंते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कवयित्री पुजा मेटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, पूजा ढवळे यांनी पुजा मेटेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मेटे यांच्या कवितांच्या अनुषंगाने काव्यचिंतन झाले. तसेच पुढील काळात पुजा यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याचा मनोदय यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. पहिल्या सत्राचे प्रस्ताविक सुमेध हनमंते यांनी केले.सूत्रसंचलन कैलास धुतराज यांनी तर आभारप्रदर्शन अनुरत्न वाघमारे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात कवयित्री रुपाली वैद्य वागरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कविसंमेलनात विशालराज, सुमेध हनमंते, शीतल भोरगे, पांडूरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, पुजा ढवळे, रुपाली वैद्य वागरे यांच्या कविता सादरीकरणासह कवयित्री पूजा मेटे यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक विशालराज वाघमारे यांनी केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन पूजा ढवळे यांनी तर ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर गच्चे, सुनंदा वाघमारे, सुप्रिया वाघमारे,विशालराज वाघमारे, स्वरुप वैद्य, दिशा ढवळे, दीक्षा ढवळे, स्वराली वैद्य, मैत्रादीदी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.