नांदेड आणि चव्हाण घराणे एक अतूट नाते..!


ना.अशोकराव चव्हाण जन्मदिवस विशेष 


राज्याचे राजकारण पवार, ठाकरे, पाटील, देशमुख, मुंडे आणि चव्हाण या नावाशिवाय पूर्ण होवू शकत नाही. आजपर्यंत अपवाद वगळता या घराण्यातील नेत्यांनीच राज्यातील सत्तेची चावी आपल्याच हातात ठेवल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे याच घराण्यातील राज्यकर्त्यांनी राज्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आणि   यातील एक घराणे म्हणजे चव्हाण घराणे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात नेहमीच डॉ. शंकरराव चव्हाण यांचा दबदबा कायम राहिला होता. राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रातील कॅबिनेट मंत्री अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. यावरून त्यांचे राजकारणात असलेले वर्चस्व आपणास दिसून येते.


डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैद्राबाद) विद्यापिठातून ते बी.ए, एल.एल.बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली; पण रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.जिल्ह्याचा विकास आणि चव्हाण कुटुंबिय यांचे नाते नेहमीच अतूट राहिले.

नांदेडच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात शंकरराव चव्हाण यांच्यासह अशोक चव्हाण यांचा मोलाचा वाटा असून, अडचणी, संकट कोणतेही असो, धाव चव्हाणांकडेच. आगामी काळातही त्यांच्याकडूनच विकासाची अपेक्षा नांदेडकर ठेवताताच. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच शहर आणि जिल्ह्याचा विकास झाला आहे. यापूर्वी जिल्ह्याचे नेतृत्व दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी केले. तोच वसा आता जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि सुपुत्र यांनी घेतला आहे.

प्रत्येकवेळी शहर व जिल्ह्याच्या प्रश्नावर ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात. त्यामुळे नांदेडात विकास कामांना निधी मिळतो. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी नांदेडला नेहमी झुकते माप दिले असल्याचे सर्वश्रुत आहे. चव्हाण हे उच्चशिक्षित आणि मुसद्दी राजकारणी आहेत. कोणतीही समस्या त्यांच्याजवळ घेवून गेल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी ते परिश्रम घेतात. ते एलबीटीच्या त्रासापायी कंटाळलेल्या व्यापाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारशी भांडण करुन व्यापाऱ्यांची एलबीटीच्या त्रासातून मुक्तता केली. चव्हाण हे नांदेडचे निर्विवाद नेतृत्व आहेत.

आजपर्यंत कितीही संकटे आली तरी, नांदेडकरांचे प्रेम कधीही कमी झाले नाही हे विशेष. चव्हाण कुटुंबियामुळे नांदेडला कधी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळेच नांदेडचा विस्तार झाला. त्यामुळे येथील व्यापार वाढला. शेजारील जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी नांदेडात येतात. अशोक चव्हाण यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असून, 3 नोहेंबर २००८ रोजी मध्ये गुरु-त्ता-गद्दी सोहळ्यासाठी नांदेडात देश-विदेशातून लाखो भाविक आले. त्यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता़. त्या निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात आला.

आतापर्यंत जिल्ह्यात अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत. शहरात विमानतळ उभारले, मोठ-मोठ्या पुलांची उभारणी केली. दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते आता अशोक चव्हाण यांच्यापर्यंत चव्हाण कुटुंबियांनी नेहमीच नांदेडच्या विकासासाठी मोठे  योगदान दिले आणि देत आहेत. नांदेड येथील कोणत्याही संकटात समोर येणारे पहिले नाव हे चव्हाणांचे असते.

हे विशेष…आज खऱ्या अर्थाने पालकमंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याला लाभले ते त्यांच्या कर्तृत्वानेच. आशा कर्तृत्वान आणि कणखर नेतृत्वाला जन्मदिनी मनःपूर्वक शुभेच्छा.

-अविनाश पाईकराव,नांदेड

ई-मेल:[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *