सिताफळ ; एक महत्वपूर्ण आयुर्वेदिक वनस्पती


 

सिताफळ:– सं.गु.- सीताफळ, हिं.बं.- आथ, इं.- Custard apple, लॕ.- Anona sqamsoa   

   कोरडवाहू फळझाडांमध्ये सिताफळ हे महत्त्वाचे फळपीक असून प्रामुख्याने अवर्षणग्रस्त भागात व हलक्या डोंगराळ जमिनीत ह्याची लागवड केली जाते.

सिताफळाचे बीज लावल्यानंतर / लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनी फळे येतात. अशोकाच्या पानासारखी पाने असतात. पर्यावरणाच्या संतुलनासाठी पडिक, माळरानावर ह्या सिताफळाची लागवड करणे ही काळाची गरज आहे. दरवर्षी दसरा सणाच्या काळात म्हणजे अॉक्टोबर महिन्यात अतिशय मधुर, जीवनसत्वयुक्त, पौष्टिक अशी सिताफळं म्हणजे, हा गरीबातल्या गरीबांचा रानमेवा खायला मिळतो.      

 प्राचिनकाळापासून सर्वांना परिचित असा हा सिताफळाचा रानमेवा माळरानावर, जंगल, दऱ्या-खोऱ्यांतून सहज उपलब्ध होतो. परंतु वाढत्या लोकसंखेच्या भस्मासूरामुळे चुली वेगळ्या झाल्या. परिणामी अमाप जंगलतोड झाली. त्यामध्ये सिताफळाच्या झाडांचीही भरपूर तोड झाली आहे. म्हणून गावरान व नैसर्गिक रानमेवा खाण्यासाठी नव्याने पडक्या जमिनीवर सिताफळाची फळबाग एक महत्त्वाचा, कमी खर्चाचा पूरक व्यवसाय म्हणून लावणे अत्यंत आवश्यक आहे. आणि कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना व पावसाचे प्रमाण कमी असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना ‘सिताफळ लागवड‘ ही सुवर्णसंधीच आहे.   

   सिताफळाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश व बिहार इ. राज्यांमध्ये केली जाते. महाराष्ट्रामध्ये नांदेड, बीड, जळगाव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिताफळाची झाडे दिसून येतात. सिताफळाच्या पानांच्या उग्र वासामुळे शेळ्या, मेंढ्या, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी या सिताफळांच्या झाडांना खात नाही. म्हणून कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही ह्या फळझाडांची सहज व चांगली जोपासणा करता येते. आणि ही सिताफळाची झाडं अगदी माळरानावर, खडकाळ रानापासून ते रेताड जमिन अशा कोणत्याही जमिनीत कमी पाण्यावर वाढू शकतात.   

   गुणधर्म:-   

  ——–  अत्यंत मधुर, शीत (थंड), ह्रद्य, बलकारक, वातल, कफकारक, पौष्टिक असून पित्तनाशक आहे. हे फळ शीत म्हणजे थंड असल्यामुळे ‘शीतफल’ चा अपभ्रंश होऊन ‘शिताफळ / सिताफळ’ असे नाव पडले आहे.       सिताफळ हे अत्यंत मधुर म्हणजे गोड व पौष्टिक असते. ह्याचा नुसता गर खातात किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत करतात. सिताफळामध्ये पौष्टिक गर व पुष्कळ काळ्या बिया निघतात. सिताफळामध्ये भरपूर खनिजे व जीवनसत्वाचे प्रमाण असल्यामुळे हे एक पूरक अन्न आहे.     

 सिताफळाच्या ताज्या १०० ग्रॅम गरामध्ये पुढीलप्रमाणे अन्नघटकद्रव्यांचा समावेश होतो. 

     पाणी              :  ७३.३० %       प्रथिने             :  १.६० %       खनिजे            :  ०.७० %       पिष्टमय पदार्थ  :   २३.५० %       चुना               :   ०.२० %       स्फुरद            :    ०.४७ %       लोह               :    १.०० %


औषधी उपयोग

-१) डोक्यातील ऊवा व लिखा मारण्यासाठीः

सिताफळाच्या बिया बारीक वाटून रात्री झोपताना डोक्याला लावावे. त्यावरुन घट्ट सुती कापड बांधावे. त्यामुळे डोक्यातील सर्व ऊवा, लिखा मरतात. परंतु हे मिश्रण डोळ्यांत जावू नये याची खबरदारी स्वतः घ्यावी. कारण डोळ्यांत गेल्यास अंधत्व येऊ शकते.

२) मूत्राघातः

लघवी कोंडली असेल तर सिताफळाची मूळ उगाळून लावल्यास लघवी साफ होते.३) पानांचा वापर कडवट औषधी बनविण्यासाठी केला जातो.

इतर उपयोगः

  १) सिताफळाच्या बियांपासून तेलनिर्मिती केली जाते. त्या तेलाचा साबण निर्मितीसाठी उपयोग केला जातो.

२) कुजलेल्या फळांच्या ढेपेचा खत म्हणून उपयोग केला जातो.

३) सिताफळाची भुकटी / पावडर करुन ती आईस्क्रीम बनविण्यासाठी वापरली जाते. 

४) सिताफळाच्या मोठ्या व जून्या झालेल्या खोडावरील खरखरीत साल व टणक वाळलेल्या फळांची कुटून बारीक पावडर तयार करुन ती ‘कातडी कमावणे’ ह्या व्यवसायासाठी वापरली जाते. 

                  – लेखक – कवी डॉ.माधव कुद्रे                                  

 (कंधारकर)   बी.ए.एम.एस.    मो. +९१ ९०४९२३२०१७

 ‘आयुर्वेद चिकित्सक’, ‘मातोश्री क्लिनिक’,         

 भवानी नगर कमानीसमोर, मेन रोड,

कंधार.ता. कंधार. जि.नांदेड.    पिनः ४३१७१४      

        ईमेलः [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *