रविवारी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून ठेवून पक्षप्रमुख या नात्याने चौफेर फटकेबाजी केली. भाजपावर राजकीय टीका करीत असतांना वैयक्तिक पातळीवर विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केले होते. रविवारी झालेल्या भाषणात त्यांनी विरोधकांना जोरदार टोला सुद्धा लगावला होता.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका, भाजप खासदार नारायण राणेंच्या जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरेंनी राणे यांना रविवारी (२५ ऑक्टोबरच्या) दसरा मेळाव्यात ‘बेडूक’ म्हणून संबोधलं होतं.नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांना बेडकाची उपमा दिली होती. परंतु राणे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा नेते, खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरात टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. एवढेच नव्हे तर हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीही लायक नाही, अशी जोरदार टीका भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी केली. पुढे बोलताना राणे म्हणाले की, दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होते. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसे बोलवे, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत असे सुद्धा राणे यांनी बोलून दाखविले होते.
कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, असं सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या ४० वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला.
शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात विरोधकांना जोरदार टोले लगावले होते. तसेच विरोधकांना जोरदार प्रतिउत्तर सुद्धा दिले होते. त्यातच गेले अनेक दिवस राणे पिता-पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सतत टीका करताना दिसत होते. या टीकेचा काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणे पिता-पुत्रांवर केली होती. त्यानंतर नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चांगलेच चवताळले होते. माजी खासदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो”, असं ट्विट निलेश राणेंनी केले आहे.
दुसऱ्यांची पिल्लं वाईट…मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी ट्विटरवरुन केली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिने-अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर केलेल्या जोरदार टीकेला आता कंगना राणावत हिने प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे वागू नका. तुम्ही केवळ जनतेचे सेवक आहात. तुमच्या आधीही या पदावर कोणीतरी होतं आणि लवकरच दुसरा कोणीतरी येईल,’ असा इशारा कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
सुशांत सिह प्रकरणात कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांविरोधात अपशब्दाचा वापर केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत शिवसेनेला अनेक वेळा डिवचण्याचा प्रयत्न तिने केला होता. त्यातच तिला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देऊन राज्य सरकारला खिजवण्याचे काम केंद्राने केले होते.
मात्र राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते. तसेच विरोधकांच्या सुरु असलेल्या टीकेला येणाऱ्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन बोलेन असे ते म्हणाले होते. रविवारी झालेल्या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
कंगनाचं नाव न घेता त्यांनी त्याला ‘नमक हराम’ म्हणून कंगनाला हिणवले होते. स्वत:च्या राज्यात खायला मिळत नाही म्हणून हे मुंबईत येतात आणि इथे नमकहरामी करतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. या टीकेला कंगनाने ट्विटरवरून उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे देशात फूट पाडत आहेत. मुंबईनं आश्रय दिला नसता तर माझ्या राज्यात मला खायला मिळालं नसतं असं ते म्हणतात. त्यांना हे बोलताना लाज वाटली पाहिजे. शिवशंकर व देवी पार्वतीशी नातं सांगणाऱ्या व पांडवांनी आश्रय घेतलेल्या हिमाचलबदद्ल उद्धव ठाकरे यांचं मत इतकं क्षुद्र आणि खुनशी असेल असं वाटलं नव्हतं. हिमाचल ही एक देवभूमी आहे. अनेक मंदिरं तिथं आहेत. सफरचंद, किवी, डाळींब व स्ट्रॉबेरीचं उत्पादन तिथं घेतलं जातं,’ असं तिनं म्हटलं आहे.
अभिनेत्री कंगणा राणावतने जोरदार उत्तर दिलंय, तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, असं कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्री हे देश विभागण्याची भाषा करत असल्याची टीका कंगणाने केली. कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, ‘जशी हिमालयाचं सौंदर्य संपूर्ण भारतीयाचं आहे, त्याचप्रमाणे मुंबई ज्या संधी देते त्या आम्हा सर्वांशी संबंधित आहे. ही दोन्ही माझी घरं आहेत. उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याकडून आमचे लोकशाही अधिकार काढून घेण्याचा आणि आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची घाणेरडी भाषणं तुमच्या नाकर्तेपणाचं अश्लील प्रदर्शन करतात.’ कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ती म्हणाली की, ‘तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. जनतेचे सेवक असूनही तुम्ही याप्रकारच्या क्षुल्लक भांडणांमध्ये सामील होत आहात. तुम्हाला ती खुर्ची शोभा देत नाही, ज्यावर तुम्ही बसून घाणेरडं राजकारण करत आहात.कंगणा आणि शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादाला आता नवीन तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या याच भाषणावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य व भाषणातून सादर केली. खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी २६ ऑक्टोबरला नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. सुशांत सिंह राजपूतचा खून करण्यात आलाय आणि यात आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, असा थेट आरोप राणेंनी केला. नारायण राणेंनी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा खून झाला, ही आत्महत्या नाही असा दावा केला. सुशांत मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी, पोर्टमार्टम रिपोर्टचा दाखला देत ही आत्महत्या असल्याचा दावा केला. मुंबई पोलिसांच्या चौकशीवर आरोप झाले. प्रकरण सीबीआयकडे गेलं.
सीबीआयने ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) टीमला याबाबत पुन्हा तपासणी करण्यास सांगितलं. सीबीआयने काही दिवसांपूर्वी याबाबतचा रिपोर्ट सादर केला होता. एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी याबाबत बोलताना सांगितलं होतं, “सुशांतचा मृत्यू पंख्याला लटकून आत्महत्या केल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गळफासाशिवाय कोणत्याही खूणा अंगावर नव्हत्या. त्याचसोबत विरोध केल्याच्या खूणाही नव्हत्या.”
सुशांतच्या शरीरात नशा आणणारा पदार्थ सापडला नसल्याचं बॉंबे फॉरेंसिक सायन्स लॅब आणि एम्सच्या टॉक्सीकोलॉजी लॅबच्या तपासात स्पष्ट झाल्याचं डॉ. गुप्ता म्हणाले होते.सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा जून ८ रोजी मृत्यू झाला. नारायण राणेंनी दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर ५ ऑगस्टला तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहीलं.
त्या पत्रात सतीश सालियन म्हणतात, “माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. या स्टोरीज पूर्णत: चुकीच्या आणि फेक आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत.”दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलीवूडमधील मोठ्या अॅक्टरसोबत पार्टीच्या बातम्या पूर्णत: बनावट आहेत,” असं तिच्या वडीलांनी स्पष्ट केलं होतं.
दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बोलताना पोलिसांनी, दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचसोबत पंचनामा करताना आई-वडील उपस्थित असल्याची माहिती दिली होती.
नारायण राणेंनी दिशाला ढकलून दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. दिशाच्या वडीलांनी पत्रकारांशी बोलताना, दिशाचा खून झाल्याचा दावा फेटाळला होता. “दिशाच्या मृत्यूप्रकरणी माझा कोणावरही संशय नाही. मुंबई पोलिसांनी मला पुरावे दाखवले. पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला. माझी मुलगी गर्भवती नव्हती,” असं सतीश सालियन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ८ जूनला दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रीणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली. दिशाच्या लंडनमधील मैत्रीणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली.
सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभागसुशांतची आत्महत्या नसून हा खून आहे. खूनाचे आरोपी गजाआड होतील. त्यातील एक मंत्री असेल. तो यांचा पुत्र असेल, असा थेट आरोप नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन केला. सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचंही त्यांनी पुढे म्हंटलं.
आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? असतील तर सादर करा, याप्रश्नाचं उत्तर देताना राणे म्हणाले, “सीबीआयने विचारणा केली तर मी हे पुरावे सीबीआयला देईन.” राणेंनी तिसऱ्यांदा आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. मात्र, पत्रकारांना पुरावे दाखवलेले नाहीत. त्यांनी सीबीआयला याबाबत माहिती दिलेली नाही किंवा दोन महिने चौकशी केल्यानंतर अजूनही सीबीआयने त्यांना याबाबत विचारणा केलेली नाही. तर युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑगस्ट महिन्यात राणेंच्या आरोपांनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत आदित्य ठाकरे म्हणतात, “सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही.”
यांच्याकडे १४५ आमदार नाहीत. यांनी ५६ आमदारांवर बेईमानीकरून मुख्यमंत्रिपद मिळवलं. हिंदूत्वाला मुठमाती देऊन त्यांनी हे पद मिळवलं असा आरोप नारायण राणेंनी केला. याची सत्यता पडताळणी करताना आढळून आलं, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढले. फेब्रूवारी २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभेचा फॉर्म्युला शिवसेना-भाजपने एकत्र येऊन पत्रकार परिषदेत जाहिर केला. ज्यात उद्धव ठाकरे, तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “लोकसभेला भाजप २५ आणि शिवसेना २३ जागा लढवणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्या-निम्या जागा लढवणार आहेत. त्याचसोबत पद आणि जबाबदाऱ्याही समान पद्धतीने सांभाळण्यात येतील. पुढे यात काही कंन्फ्युजन निर्माण झालं तर उद्धवजी आणि अमितभाई जो निर्णय घेतील तो अंतीम असणार आहे.”
पण, या पत्रकार परिषदेत पद आणि जबाबदाऱ्यांचं सम-समान वाटप असा निर्णय झाला असला तरी मुख्यमंत्रीपदाबाबत ठोस निर्णय स्पष्ट करण्यात आला नव्हता. विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाची मागणी केली. पण, “अमित शहांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेसोबत अडीच वर्षं शेअर करण्याबाबात आश्वासन दिलं नाही,” असं फडणवीस म्हणाले होते.
फडणवीसांच्या दाव्यावर बोलताना “अमित शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अडीच वर्षं मिळेल असं ठरलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही पद आणि जबाबदारी यांच समसमान वाटप होईल, असं जाहीर केलं होतं. मग मुख्यमंत्री हे पद नाही का? की मुख्यमंत्रिपद ही जबाबदारी नाही?” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला.शिवसेना-भाजपच्या जागावाटपाची चर्चा बंद दरवाज्याआड झाल्यामुळे यात कोणाचा दावा खरा आणि कोणाचा खोटा हे ओळखता येणं कठीण आहे.
कोरोनामुळे देशातील सर्वांत जास्त रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. पण, त्यावर उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. भाषणात साधा उल्लेखही नाही. राज्यात ४३ हजार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मग त्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाबाबत एकही शब्द काढला नाही. सरकारच्या कामांबाबत माहिती दिली नाही. “जे काम आज झालं आहे ते पुढच्या महिन्यात लोकांसमोर मी ठेवणार आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र कोरोनाबाबत उद्धव ठाकरे वेळोवेळी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी चर्चा करत असतात.
उद्धव ठाकरे मंत्रालयात भेटत नाहीत. मातोश्रीत प्रवेश नाही. यांना विचारतं कोण? किती शिवसैनिक विचारतात? असा थेट हल्ला राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रिपद देतील अशी आशा शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना होती. मात्र रामदास कदम, दिवाकर रावते यांसारख्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तर, आरोग्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळणारे दीपक सावंत यांनाही विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. कोरोनाच्या काळात माझ्या अनुभवाचा फायदा घेता आला असता, असं म्हणत दीपक सावंत यांनी नाराजी बोलून दाखवली.
कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये माजी मंत्री असलेले भास्कर जाधव यांनी मंत्रिपद मिळालं नसल्याची नाराजी उद्धव ठाकरेंसोबत एका कार्यक्रमात व्यासपिठावर जाहीर दाखवून दिली. तर, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंच्या बैठकीला दांडी मारली. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळालं.
आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, शिवसेना आमदारांची कामं होत नाहीत. स्थानिक जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. या उलट आमच्या मित्रपक्षाचे मंत्री त्यांच्या आमदारांची कामं करतात,” अशी खंत एका आमदाराने व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या कारभारामुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, पक्षात उद्धव ठाकरेंविरोधात असंतोष आहे असं ठामपणे सांगता येणार नाही.
मराठ्यांना आम्ही आरक्षण दिलं. कोणत्या कलमाने दिलं? यापुढे कोणत्या कलमाने देणार? याबाबत थोडी माहिती आहे का? कायदा, घटना काय माहीत आहे यांना? असा आरोप राणेंनी केला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण सरकार देणार, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. पण, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची सुनावणी खंडपिठाकडे पाठवल्यामुळे मराठा समाज नाराज झालाय. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार अपील करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. सरकारने सुप्रीम कोर्टात अपील करणारी याचिका दाखल केली आहे.
‘
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार ते हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहेत. बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस अशा पोळ्या ते भाजणार आहेत? खुर्चीसाठी त्यांनी दिलेली हिंदुत्वाची शिकवण आज ते विसरले आहेत, हेच सत्य आहे’, अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या ठिकाणी तुमचा मेळावा झाला त्या सावरकरांचे हिंदुत्वही तुमच्या पचनी पडले नाही, असे नमूद करताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गावर आम्ही चाललो आहोत, असे पाटील यांनी नमूद केले. ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’, हे मोहन भागवत यांचे वाक्य आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी होते. केवळ खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरू आहे. सोयीप्रमाणे हिंदुत्व बदलणाऱ्यांकडून हिंदुत्व शिकून घेण्याची आम्हाला गरज नाही, असा पलटवारही पाटील यांनी केला.
‘मी कुटुंबप्रमुख आहे’ असे तुम्ही म्हणालात. त्याआधी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करत असताना ‘हे शेतकऱ्यांचे सरकार आहे’ असे विधान तुम्ही केले. मात्र दसरा मेळाव्याच्या तुमच्या भाषणात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर अवाक्षरही नव्हतं. करोनाच्या परिस्थितीवरही तुम्ही चिडीचुप बसलात. केवळ आपलेच ढोल बडवण्यात तुम्ही समाधान मानले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण अभ्यासशून्य आणि सूड भावनेने प्रेरित होते, हे स्पष्ट होते, असेही पाटील पुढे म्हणाले. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. १२ कोटींचे कुटुंब तुम्हाला सांभाळायचे आहे. केवळ भाषणबाजी करून काहीही होणार नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपल्या भाषणात लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या व्यक्तींबद्दल अर्वाच्य भाषेचा तुम्ही उपयोग केलात. राज्यप्रमुख असल्याचाच विसर तुम्हाला पडल्याचे यातून दिसले, असे पाटील म्हणाले.
अॅड. रत्नाकर चौरे या वकीलांनी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भारत देशाची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या दहशतवादी आणि मुस्लिम राष्ट्राशी केली. त्यामुळे या तुलनेनं भारताचा अपमान झाला आहे. याचप्रमाणे हिंदुत्वाचा त्याग करून त्यांनी राज्याची सत्ता संपादन करून राष्ट्रीय व धार्मिक भावना दु:खविल्याचाही आरोप तक्रारदारकडून करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. मात्र आता शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यात भारताचा आपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे एका वकीलाकडून करण्यात आला आहे.
दसरा मेळाव्याचं भाषण हे दसऱ्याचं नसून शिमग्याचं होतं. शिमग्याला जसं आपण विरोधकांच्या नावानं बोंब मारली जाते, तसंच हे भाषण होतं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जबरी टीका केली. उद्धव ठाकरेंची ती परंपरा नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते शोभत नाही. केवळ मुख्यमंत्र्याचा मास्क काढून मी बोलतोय, असं म्हणून जमत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणात, मराठा आरक्षणावर, राज्यातील कोरोना परिस्थितीवर किंवा राज्यातील शिक्षणासंदर्भात काहीही भाष्य केलं नाही. राज्यातील शाळा कधी सुरू होतील, यावरही ते काहीही बोलले नाहीत. शाळा सुरू होण्याबद्दल काहीच माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, असेही पाटील यांनी म्हटलं. तुम्ही ज्याप्रकरची शिवराळ भाषा वापरली, रावसाहेब दानवे, राज्यापालांपासून ते मोदींपर्यंत टीका केली, गोमुत्र, शेण, हिंदुत्व यावर बोलले, मग एखाद्याला चापट मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याइतकी आमची परिस्थिती नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बेडूक म्हणून अप्रत्यक्षपणे त्यांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आमदार नितेश राणे यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलंय. बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी लस घेतलेली दिसते. जास्त हवा भरली असेल तर टाचणी तयार आहे फक्त योग्य वेळ येऊ द्या. असं नितेश राणे म्हणाले. दुसऱ्या ट्वीटमध्ये “दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट.. मग यांनी काय मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? दिशा सालियान ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” तसेच अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली. उद्धव ठाकरेंच्या मुलांचा पेंग्विन आणि पाल असा उल्लेख त्यांनी यावेळी केली. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध ठाकरे यांच्यातील हे वाकयुद्ध चांगलेच रंगले असे वाटते.
उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या थकलेल्या आणि चिडलेल्या बापाचं भाषण होतं, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव आम्ही घेतलं नव्हतं, ते स्वत:च स्पष्टीकरण देत आहेत, मुलगा-वडील स्वत:च सांगत आहेत, आदित्य ठाकरे श्रावण बाळ आहे, असं टोला देखील नितेश राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे पिता- पुत्रावर लगावला आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा…,’ असं आव्हानच नीलेश राणे यांनी दिलं आहे.
नाव न घेता उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका केली असं सगळे म्हणतात. नाव घ्यायची हिंमत त्यांच्यात नाही, त्यांना माहितीय चीरफाड होईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंना टीकेला निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता टीका केली. मीही फावडा आणि पेंग्वीन म्हणू शकतो, महाराष्ट्राला माहितीय फावडा कोण अन् पेंग्वीन कोण. व्यासपीठावर जाऊन मीही काहीही बोलू शकतो, जर हे इथं थांबलं नाही तर मीही काहीही बोलेन. उद्धव ठाकरे ज्या भाषेत बोलले, त्याच भाषेत आम्ही त्यांना उत्तर देणार, असे निलेश राणे यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंनी छताडावर पाय ठेऊन आडवे करू अशी भाषा वापरु नये, त्यांना ती शोभत नाही. किती केसेस उद्धव ठाकरेंच्या अंगावर आहेत, किती केसेस आदित्य ठाकरेंच्या अंगावर आहेत, पण शिवसैनिकांच्या अंगावर दहा-10 केसेस आहेत. कमकुवत आणि कमजोर लोकांच्या अंगावर जाण्याचं काम शिवसेना करते. नशिबानं ते मुख्यमंत्री पद मिळालंय, भीक मागून, सगळे विचार वगैरे बाजूला ठेऊन हे सरकार बनलेलं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी काम करावं, कोरोना काळात महाराष्ट्र सरकारचं काम फेल ठरलंय. एखादं दुकानही चालवायचं उद्धव ठाकरेंना माहित नाही, ते आज सरकार चालवतायंत अशी घणाघाती टीकाही निलेश राणेंनी केली.
भाजप नेत्यांनी उद्घव ठाकरेंच्या भाषणावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव यांनी सावरकर सभागृहातून भाषण केलं. पण त्यांच्या भाषणात सावरकरांबद्दल एकही शब्द नव्हता. बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलं.
भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘शिवसेनेनं सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचं आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानंही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात,’ असं कदम म्हणाले.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा मास्क बाजुला ठेवून केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपावर टीका केली. याऐवजी किमान शिवसैनिकांसमोर बोलताना त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी द्यायला हवी होती, असं उपाध्ये म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण वेळ हा केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करण्यात गेला. शिवसैनिकांना सुद्धा त्यांच्या सरकारने काय केले हे सांगण्यासारखे ठोस काही नसावे. पुढच्या महिन्यात काम काय केले ते सांगणार असे सांगून भाषणाचा वेळ घालवला. आजच्या भाषणात काहीच नव्हते. औरंगजेब, वाघ, कोथळा, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही या भाषेपलीकडे काहीच नव्हते, अशी टीका उपाध्ये यांनी केली.
अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काळाचा न्याय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासलाय, शेतकऱ्यांची व्यथा भाषणात सांगितली. पण त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रूपये देऊन चेष्टाच केली आहे. जीएसटी संदर्भात केंद्राने दिलेला प्रस्ताव देशातील २० पेक्षा अधिक राज्यांनी स्वीकारला व ते पुढे गेले. मात्र, राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यात कोणताही रस नाही. कोरोना हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील कोणत्याही घटकास सरकारने दिलासा दिला नाही. अशा वेळी किमान आज शिवसैनिकांसमोर बोलताना तरी काही ठोस सांगतील, असे वाटत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री कुठे बाहेर पडले नाहीत. देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. पीपीई किट घोटाळा झाला. महिलांवर अत्याचार वाढले त्याबद्दल उध्दव ठाकरे काही बोलले नाहीत, असे उपाध्ये म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, केवळ गडबड गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. त्यांच्या भाषणात ना धड हिंदुत्व होतं, ना धड विकास होता, ना धड धर्मनिरपेक्षता होती. मी त्यांना सांगू इच्छितो, की काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, पण तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो, असा पलटवार भाजप आमदार अतुल भाटखळकर यांनी केला आहे.
भटखळकर म्हणाले, “ज्यांनी कसाबला बिरयानी दिली त्यांच्यासोबत आम्ही नाही. आम्ही याकूब मेननच्या माफीची मागणी करणाऱ्यांसोबत नव्हतो. ज्या शेतकऱ्यांचे राज्यात मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांवर तर उद्धव ठाकरे बोललेच नाही.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोबरदस्त निशाणा साधला होता. उद्धव यांनी त्यांना ‘काळी टोपी’ वाले, म्हणून संबोधित केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचं हिंदुत्व तुमच्या थाळ्या व टाळ्या वाजवण्यासारखं नाही असं ते म्हणाले. हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल व टाळ्या व थाळ्या वाजवून होणार नसेल, जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायची? स्वतः घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही.” असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वारंवार म्हटलं जातं. यातून त्यांच्या मनात असलेली एक असुरक्षितता व भीती यातून दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला केव्हाच आव्हान दिलं आहे की, अगोदर सरकार चालवून तरी दाखवा. आमचं तर म्हणणं आहे की कधीतरी घराबाहेर पडून तरी दाखवा.” असं यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान केलं. महाराष्ट्र जेव्हा एका अर्थाने महापुरामध्ये, करोनामध्ये, चक्रीवादळामध्ये ज्यावेळा त्रस्त होता. त्यावेळी तुम्ही काय करत होता? हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतो आहे.” असं यावेळी शेलार यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते, असे स्पष्ट करतानाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे समर्थन केले आहे.
राजकीय वाद, प्रतिवाद नेहमीच होत राहतात. पण ज्यांच्यावर सरळ सरळ टीका झाली त्यांनी पलटवार केला आहे. भाषणाची चिकित्सा झाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते जरी नाही म्हणाले तरी बघण्याचा दृष्टीकोन बदलत नाही. सरकारवर टीका झाल्यानंतर उत्तर देणे भाग होते. परंतु सत्ताधारी पक्षाला संयम बाळगावाच लागतो. टीका सहन करावी लागते. राजकारणात सर्व काही सही रे सही असते, असे मानले जाते. परंतु कोणत्याही विषयावर जनतेशी प्रतारणा होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. आपली विधाने, भान, संयम ही प्रमाणित असली पाहिजेत. राजकीय टीका टिप्पणीत वेळ घालविण्यापेक्षा राज्याच्या विकासाचे चिंतन होणे गरजेचे आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
२८.१०.२०२०