इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली
करिअर गाईडन्स सेमिनारच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या गळ्यातील ताईत बनलेले ख्यातनाम वक्ते, स्तंभलेखक व प्रशिक्षक तथा नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांची मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार व महाराष्ट्र प्रदेश महासचिव इंजि. मधुकर मेहेकरे यांनी जारी केले आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीदशेतच सामाजिक कार्याची सुरुवात करणाऱ्या इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांनी विद्यार्थी व तरुणांसाठी प्रबोधनाच्या माध्यमातून मागील तीस वर्षात केलेल्या कार्याची दखल घेऊन वीभविपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी कामाजी पवार व इंजि. मधुकर मेहेकरे यांनी सदरील पत्राद्वारे केली आहे.
अमोघ वक्तृत्व व अतुलनीय लेखनाद्वारे विद्यार्थीह्रदयसम्राट, शिवशंभुरत्न, दि बेस्ट मोटिव्हेटर, महाराष्ट्रभुषण यासारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामांकित पुरस्कार मिळविलेले इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर हे देशभर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची विक्रमी उचांक मोडणारी गर्दी खेचणारे वक्ते म्हणून प्रसिध्द आहेत, त्यामुळेच त्यांना विद्यार्थ्यांच्या गर्दीचा बादशहा म्हटले जाते. राज्यभर गाजलेल्या विनोद बोरे यांच्या ‘माझा बाप’ या पुस्तकांचे सहसंपादक असलेल्या इंजि. शिवाजीराजे पाटील लिखित ‘अंतरनाद’ या कँलनमँपल पब्लिशिंगच्या पहिल्याच मराठी साहित्य संग्रहाने तरुणाईला वेड लावले असून विक्रमी विक्रीचा उच्चांक गाठण्याकडे त्यांच्या ‘आंतरनाद’ व ‘शिवास्त्र’ या दोन्ही पुस्तकांची वाटचाल सुरु आहे. मराठवाडा नेता, प्रजावाणी, गोदातीर समाचार, महासागर समाचार, देशोन्नती, सकाळ, लोकप्रश्न, चित्रलेखा, इत्यादी नियतकालिकांमधुन नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या लेखमालांना चोखंदळ वाचक नेहमीच भरभरून दाद देतात.
अँड. पुरुषोत्तम खेडेकर, कामाजी पवार, इंजि. मधुकर मेहेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देशभर विद्यार्थी व तरुणांचे मजबूत नेटवर्क उभारुन नव्या विज्ञानयुगासाठी आवश्यक सर्वगुणसंपन्न व सशक्त मन, मनगट, मेंदू, मणका, मानसिकता असणारा युवक घडवून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहण्याची ग्वाही यावेळी इंजि. शिवाजीराजे पाटील यांनी दिली. मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव अशा विविध पदांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इंजि. शिवाजीराजे पाटील यांच्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी करण्यात आलेल्या या निवडीचे देशभरातील असंख्य विद्यार्थी व तरुण चाहत्यांनी स्वागत केले आहे.