नांदेड –
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण विभागामार्फत लाळ खुरकत आजारावर उपचार करण्यासाठी जनावरांकरिता लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. जवळा दे व जवळा पू या दोन्ही गावात मिळळून एकूण साडेपाचशे पशुधनाला लसीकरण करण्यात येऊन ओळख दर्शवणारे बिल्लेही कानाला टोचण्यात आले आहेत. जवळा देशमुख जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खुल्या प्रांगणात सहा महिन्यांपुढील सर्वच वयोगटातील पशुधनाच्या लसीकरणास प्रारंभ झाला त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ए. गोरे, डॉ. एम. एस. कुंभार, डॉ. माधव राजेगोरे, डॉ. मिलींद खिल्लारे, मुख्याध्यापक ढवळे जी.एस. यांची उपस्थिती होती.
शेवडी बाजीराव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत असलेल्या सर्व गावांमध्ये लसीकरण व पशुधनाच्या कानात १२ अंकी ओळख क्रमांकही टॅगिंगसह दिला जात आहे. शेवडी बाजीराव, खडकमांजरी, शेवडी तांडा, खडकमांजरी तांडा या गावांतील लसीकरण व ओळख क्रमांक देण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. आता गाय, बैल, म्हैस यांची ओळख क्रमांकाशिवाय खरेदी विक्री होणार नाही. नैसर्गिक आपत्तीने दगावल्यास बिल्ल्याशिवाय भरपाई मिळणार नाही. विद्युत तारेला चिकटून तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावल्यास तसेच बँकेकडून कर्ज मिळवितांना विमा उतरविण्यासाठीही ओळख क्रमांक दर्शविणारा टॅग आता आवश्यक ठरविण्यात आला आहे.
ज्या जनावरांच्या कानात १२ अंकी बिल्ला टोचलेला आहे आशा सर्व जनावरांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. घरी बसून याद्वारे जनावरांची माहिती मिळू शकेल. तसेच शासनालाही ही माहिती उपयोगी पडणार आहे. जवळ्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून राहिलेल्या गावातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोरे यांच्यासह त्यांच्या पथकातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पशुवैद्यकीय दवाखाना शेवडी बाजीराव यांनी केले आहे.