तिसरी घंटा

५ नोव्हेंबर मराठी रंगभूमीदिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामूळे सध्या रंगभूमी पर्यायाने नाट्य व्यवसायाय सध्या ठप्प झाला आहे… कोरोनाचे सावट लवकरच दूर होईल आणि तिसरी घंटा पुन्हा ऐकू येईल अशी आशा करून सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा…

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने माझ्याही आठवणी ताज्या झाल्या… नाट्यस्पर्धा, तालमी, रंगमंच, तिसरी घंटा, प्रवेश या साऱ्या गोष्टी नव्याने डोळ्यासमोर आल्या.


मी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा पुढे कॉलेज मध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी हमखास नाटकात भाग घेत असे. अगदी पहिलीत असतानाचा एकही संवाद नसलेला कृष्ण ते १९९६ मधलं गजेंद्र अहिरे यांच्या नाटकातील भुमिका या साऱ्या भुमिका आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

कॉलेज संपल्यावर मी १९९० ला डोंबिवलीत आलों. डोंबिवली ही सांस्कृतीक नगरी असल्याने इथे नाटक या माझ्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन मिळालं. नाट्यदुंदुभी या श्री.सु.श्री.इनामदार यांच्या संस्थेत सहभाग घेतला आणि नाटकाची आवड प्रवास तसाच पुढे चालू ठेवला. राज्यनाट्य स्पर्धा, कामगार स्पर्धा, होशी, प्रायोगिक ते व्यावसायिक अशा सर्व नाट्य क्षेत्रात काम करण्याचा योग आला. गडकरी रंगायत ते प्र. के. अत्रे नाट्यगृह कल्याण, शिवाजी मंदीर ते कालिदास, मुलुंड अशा विविध नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग करण्याची संधी मिळाली. अगदी दिल्लीला एन.एस.डी., पृथ्वी थिएटरला प्रयोग करण्याचीही संधी मिळाली. खऱ्या अर्थाने नाटक या क्षेत्रात अगदी बुडून गेलो होतो. नोकरी करत नाटकाच्या तालमी आणि नाटकं करायची ही तारेवरची कसरत आवड, छंद (खाज) असल्याशिवाय शक्यच नव्हतं.


मच्छिंद्र कांबळी, बाळ कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, नाना पाटेकर, निळू फुले, विक्रम गोखले ते सतीश तारे, प्रशांत दामले… अशा अनेक दिग्गज गुणवंत कलाकारांच्या भुमिका मी आवड आणि अभ्यास म्हणून पाहिल्या आहेत. आजही पाहतो…

नोकरी, नाटक या गोष्टी सांभाळत असताना १९९७ ला माझ्या आयुष्याची तिसरी घंटा वाजली. नवरा ही कायमची भुमिका स्विकारली आणि नट/नाटक यावर मोठ्या जड अतःकरणाने नाखुशीने फुल ठेवावं लागलं. कारण नोकरी, नाटक आणि संसार या तीनही गोष्टी एकत्रीत करणे सांभाळणे शक्य नव्हतं. पोटासाठी पुर्णवेळ नाट्यक्षेत्र स्विकारणं त्यावेळी मला धोक्याचं वाटलं. नोकरी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. पण संसार/लग्न किंवा नाटक यातली एकच गोष्ट स्विकारायची जेव्हा वेळ आली तेव्हा घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्याने तिसरी घंटा वाजताच मी लग्नाच्या बेडीत अडकलो.
पुढे कविता क्षेत्राकडे वळलो. आणि आज कवितेचा ध्यास जपतो आहे. थोडफार लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

पण आजही मला तिसरी घंटा झाली, माझा प्रवेश आला, मी रंगमंचावर ब्लँक झालो अशी स्वप्ने पडतात आणि मी घाबरून जागा होतो. आजही मी आवडीने नाटके पाहतो आणि तेवढ्यावरच माझी हौस भागवतो. आणि घरात नाटकं करतो तेवढीच…

Vijay Joshi sir

@ विजय जोशी
डोंबिवली
०५/११/२०२०
९८९२७५२२४२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *