ओबीसी – बहुजन अस्मितेचं राजकीय वादळ आकार घेतेय..!

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर
•••

ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरुवात अपेक्षेपेक्षा दणक्यात झाली. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातही लोक स्वयंस्फूर्तीने कामाला लागले आहेत. ओबीसी प्रवर्गातील छोटेमोठे जातीसमूह स्वयंप्रेरणेने पुढं येत आहेत. चर्चा करत आहेत. मीटिंगा घेत आहेत. आपलाही परिवार मोठा आहे, याचं भान त्यांना यायला लागलं आहे. आपण राजकीय दृष्ट्या एक झालो तर आपल्यावर अतिक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही, असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागला आहे. आतापर्यंत ज्याला आपण आपलं घर समजत आलो, तिथल्याच लोकांनी आपल्याला पद्धतशीरपणे लुटलं, याची त्यांना ठसठशीत जाणीव झाली आहे. ही वेदना भयंकर आहे. पण आता लोकजागर सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यावर अस्सल इलाज सापडल्याचं त्यांना समाधान आहे.

मुंबई सारख्या शहरात कठीण जाईल, असा आमचा अंदाज होता. पण अगदी त्याच्या उलट अनुभव येत आहे. मुंबईसह लगतच्या नऊ महानगर पालिका मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे चित्र प्रचंड आशावादी आहे. आश्वासक आहे. नव्या स्वातंत्र्याची चाहूल देणारं आहे !

आमची जनगणना आम्हीच करणार ही क्रांतिकारी कल्पना लोकांना मनापासून भावते आहे. इतिहासात पहिल्यांदा ओबीसींची राजकीय चेतना जागी झालेली दिसत आहे. बाबासाहेबांनी घटनेमध्ये ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद केली होती. व्हीपी सिंग यांनी मंडल आयोग लागू केला. भाजपने त्या रागापोटी व्हीपी सिंग यांचं सरकार पाडलं. ज्या ओबीसींच्या घरच्या खारका, बदामा, दूध, तूप खावून भाजपची ढेरी फुगली होती, त्याच ओबीसींच्या ताटात भाजपने माती कालवली. त्यासाठी ओबीसींच्याच धार्मिक अास्थेचा कुटील वापर केला. त्याला मंदिर – मशीद असा रंग दिला. अडवाणींनी रथयात्रा काढली. आणि राजकीय कारस्थान करून बाबरी मशीद पाडली. प्रभू रामचंद्राला देखील बेघर करून टाकलं.

अयोध्येची मंदिर – मशीद लढाई म्हणजे.. हिंदू ओबीसी विरुद्ध मुस्लिम ओबीसी.. अशी दोन भावामधील लढाई होती. ( मुस्लिम समाजात ओबीसींची संख्या मोठी आहे.. ) आणि ही लढाई पूर्णतः भाजपाच्या धर्मांध कारस्थानाचा भाग होती. मानवतेवर काळा डाग होती.

घडून गेलेला इतिहास बदलता येत नसला, तरी झालेल्या चुका दुरुस्त करून नवा इतिहास निर्माण करण्याची संधी मात्र काळ प्रत्येकाला देत असतो. ते आव्हान लोकजागर तर्फे आम्ही स्वीकारलं आहे. त्यासाठी पूर्णतः नवी आणि सकारात्मक मांडणी करत आहोत. ओबीसी जनगणना सत्याग्रह आणि आमची जनगणना आम्हीच करणार.. ही त्याची केवळ एक सुरुवात आहे. ही लढाई तीन टप्प्याची असून, हा पहिला टप्पा आहे. पुढील दोन टप्पे योग्यवेळी जाहीर करण्यात येतील.

• ५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण !
• ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार !

• राजकीय समतेसाठी, सत्तापरिवर्तन !

ही त्रिसूत्री घेवून आम्ही पहिला टप्पा सुरू केला आहे. लढाई दीर्घकालीन आहे, कार्यक्रम दूरदर्शी आहे, हेतू स्वच्छ आहे ! त्यामुळेच ओबीसी मोठ्या प्रमाणात जुळत आहेत. समन्वय समित्या गठित होत आहेत. लोक आपली ऑफीसं मोकळ्या मनानं खुली करून देत आहेत. एकदा मनात जागा मिळाली, की मग पुढचे सारे प्रश्न सहज सुटत जातात. लोकजागरची कुठलीही घोषणा किंवा कार्यक्रम म्हणजे स्टंटबाजी नव्हे. संपूर्णतः व्यावहारिक आणि कृतिशील मांडणी आहे. सारे नियोजन स्वयम् स्पष्ट आहे, पारदर्शी आहे..!

जोपर्यंत ओबीसींची राजकीय अस्मिता जागी होत नाही, तोपर्यंत कोणतीही लढाई यशस्वी होणार नाही. त्यासाठी आधी सामाजिक चेतना जागी झाली पाहिजे. सारे ओबीसी एक आहोत, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. हे आम्ही आधीपासून बोलत आलो. ते स्वप्न आता प्रत्यक्षात यायला सुरूवात झाली आहे. आणि सुरुवात खरंच दमदार झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वातावरणात ओबीसी – बहुजन अस्मितेचं नवं वादळ आता आकार घेत आहे, याच्या खुणा नजीकच्या काळात अधिक स्पष्ट होतील, अशी खात्री आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, याबाबत लोकजागरची भूमिका काय आहे ? आपले उमेदवार आहेत का ? आपले उमेदवार असायला हवे होते ! आम्ही कुणाला मतदान करायचं ? आपल्या लोकांना काय सांगायचं ? अशा प्रकारचे फोन मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून येत आहेत, ही खरंच आश्चर्यजनक आणि उत्साहवर्धक गोष्ट आहे. वास्तविक आम्ही काही तशी नोंदणी वगैरे केलेली नाही. तो विषयही आमच्या डोक्यात नव्हता. पण आज विविध ग्रुप आणि जनगणना समन्वय समितीच्या माध्यमातून शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, तरूण असे ओबीसी मधील घटक मोठ्याप्रमाणात जुळलेले आहेत. महाराष्ट्रात किमान दहा हजार सत्याग्रही सद्या कामाला लागले आहेत.. आणि शिवाय त्यांच्यासोबत अनेक संघटना संलग्न आहेत.

अर्थात हे सारेच काही एका विचारानं मतदान करतील असं नव्हे. त्या भ्रमात आपण असण्याचं कारणही नाही. ओबीसी जनगणना सत्याग्रह असो, की लोकजागर अभियान असो, त्यात सध्यातरी विविध संघटनांचे, विविध पक्षाचे लोक सहभागी आहेत. त्यांचं मतदानस्वातंत्र्य अबाधित आहे. ओबीसी जनगणना सत्याग्रह तसेच लोकजागर अभियान या दोन्ही आघड्यांच्या माध्यमातून राजकीय निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही. तसा आपल्याला अधिकारही नाही.

मात्र लोकजागर पार्टी ही स्वतंत्र आहे. त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, तो पार्टीचा अधिकार आहे. तो संपूर्णतः वेगळा विषय आहे. किंवा त्यांनी घेतलेला निर्णय कुणी स्वीकारायचा, कुणी नाकारायचा.. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ! त्याबद्दल कसलाही संभ्रम नको !

अर्थात ओबीसी – बहुजनांच्या मुक्तीची ही लढाई केवळ ओबीसींची नाही. किंवा ओबीसी विरुद्ध सरसकट एखादा जातसमूह अशी बटबटित देखील असता कामा नये ! मुळात ती सारे विस्थापित ओबीसी-बहुजन-अल्पसंख्यांक यांच्या अस्मितेची लढाई आहे ! राजकीय हक्काची लढाई आहे ! सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आहे ! सारे शोषित-पिडित एका बाजूनं आणि सारे शोषक दुसऱ्या बाजूनं, अशी ही विभागणी आहे. त्यासाठी तेली, कुणबी, माळी, धनगर, वंजारी, बंजारा, बारा बलुतेदार आदि छोट्या मोठ्या जाती समूहातील सारे वंचित एकत्र आले पाहिजे. मुळात उच्चवर्णीय असो की मागासवर्गीय, बहुसंख्यांक असोत, की अल्पसंख्यांक प्रस्थापित विरूध्द विस्थापित असाच खरा संघर्ष आहे. मात्र या संघर्षाचं नेतृत्व विस्थापित ओबीसींच्या हातात असलं पाहिजे. त्याला मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक या प्रवर्गातील सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. फार काय उच्चवर्णीय समूहातील ब्राम्हण असोत की मराठे, जे जे वंचित असतील त्या सर्वांनी या लढाईत सामील झालं पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या संख्येच्या प्रमाणात सत्तेत, संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे, हीच लोकजागरची प्रामाणिक भूमिका आहे.

न्याय आतातरी सारखा पाहिजे
अन् सुदामासही द्वारका पाहिजे
मी निघालो पुढे या क्षणा पासूनी
जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे?

तेव्हा.. झालं गेलं विसरू या. स्वच्छ मनानं एकत्र येवू या. नव्या वादळाचं स्वागत करू या ! तन – मन – धनानं या ऐतिहासिक लढाईत सहभागी होऊ या ! लोकजागर अभियान आपल्या स्वागतासाठी सिद्ध आहे..!!

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9004397917
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *