प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. आणि यामध्ये तरुणीचा मृत्यू पण झालेला आहे. ही तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही पुण्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघेही पुण्याहून नांदेडला परतत होते. त्यावेळी बीडमधल्या येळंब घाटात या तरुणानं गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने प्रेयसीच्या अंगावर एसिड टाकलं आणि तिथून तो पळून गेला. त्यानंतर तब्बल १२ तास ही तरुणी मृत्यूशी झुंज देत खड्ड्यात पडून होती. रस्त्यावरुन जाणाऱ्यांना आवाज आल्यानं ही धक्कादायक गोष्ट उघड झाली. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिचा उपचारांदरम्यान तिचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
.
पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच २२ वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल १२ तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. किती भयंकर घटना आहे ही!
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के शरीर भाजले असून प्रकृती स्थिर आहे असे सुरुवातीला म्हटले गेले परंतु ते खरे नव्हते.
काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दुर्दैवी म्हणजे पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी दोन वाजेपर्यंत तडफडत होती. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून नेकनूर पोलीस स्टेशन के ए.पी.आय.लक्ष्मण केंद्रे पुढील तपास घेत आहेत. मात्र, ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे माणुसकी जिवंत आहे का? प्रश्न निर्माण होतो.
४८ टक्के भाजल्याने तिच्या चेहर्यावर आणि अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि सकाळी जिल्हा रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणात नेकनूर ठाण्याचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे यांनी तरूणीचा मृत्युपुर्व जवाब घेतल्यानंतर अविनाश राजुरे (रा.शेळगाव, ता.देगलुर, जि.नांदेड) याच्याविरूध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान माणुसकीला काळीमा फासणार्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाल असून ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच एका सैतानी वृत्तीच्या तरूणाने तरूणीचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त होवू लागली आहे
विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुणीला भर चौकात दिवसाढवळ्या जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता, याची आठवण या घटनेने करुन दिली आहे. काॅलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या पीडित तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला होता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात ही घटना घडली. या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तेंव्हा तिची प्रकृती गंभीर होती. या मुळे पीडित तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळाला असून तिची वाचाही गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
आरोपीने हे कृत्य केल्यानंतर तो तिथून तत्काळ पसार झाला. मात्र काही तासांतच पोलीस त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. विकी नगराळे असे आरोपीचे नाव असून तो तरुणीच्या गावचाच रहिवासी असल्याचे समजले. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. या घडलेल्या घटनेमुळे हिंगणघाटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पीडित तरुणी एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षिका होती. नेहमी प्रमाणे ती कामावर जाण्यासाठी लगबगीने घराबाहेर निघाली. आरोपी तिच्या मागावरच होता. जशी ही तरूणी हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचली, तसे संधी साधून आरोपीने सोबत आणलेले आणि पेट्रोल तिच्या अंगावर टाकले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर जराही न थांबता हा आरोपी तिथून फरार झाला. हा आरोपी नेहमीच तरुणी ज्या बसने हिंगणघाटला येत असे त्याच बसमधून प्रवास करत असे. घटनेच्या दिवशी मात्र त्याने बसने प्रवास केला नाही. त्या दिवशी तो तरुणीच्या आधीच घटनास्थळी उपस्थित होता.
ही प्राध्यापक तरुणी दारोडा गावाची रहिवासी होती ती येथील मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात वनस्पती शास्त्राची प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. दररोज दारोडा येथून बसने येऊन ती स्थानिक नंदोरी बस थांब्यावर उतरते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ती नंदोरी चौकातून पायदळ कॉलेजमध्ये जात होती. त्याचवेळी तिच्या मागावर असलेली एक व्यक्ती दुचाकीवर पाठीमागून आली. त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याने स्वतःच्या गाडीतील पेट्रोल कापलेल्या प्लास्टिक बॉटलमध्ये काढले. तसेच कपडा गुंडाळलेला टेंभा त्याच्या सोबत होता. या तरुणीचा पाठलाग करीत अकस्मात तिच्या अंगावर त्याने पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकला त्यानंतर तो तेथून फरार झाला.
ही घटना घडल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी धाव घेतली. आरडाओरडा ऐकून आजुबाजूच्या लोकांनी तातडीने पीडित तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. घडलेल्या प्रकारामुळे महाविद्यालयातील तरुणींमध्ये काही दिवस भीतीचे वातावरण पसरले होते.
पत्नीने आपल्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओ पाहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरा येथे घडली. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाट येथील जळीतकांडाचं प्रकरण ताजं असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
संगीता शंकर हनवते असं या महिलेचं नाव असून, ती सुमारे ७४ टक्के भाजली होती. तर शंकर दुर्गे असं या आरोपीचं नाव.
शंकरचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. या महिलेबरोबरच्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओही त्याने बनवले होते. शिवाय दोघांचे फोटोही काढले होते. मात्र हे व्हिडिओ डिलिट करण्यास तो विसरला. नेमका त्याच्या पत्नीच्या हातात त्याचा मोबाइल लागला. त्याच्या पत्नीने हे सर्व व्हिडिओ पाहून त्यानंतर त्याला जाब विचारला असता शंकर बिथरून गेला होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झालं. त्यामुळे आपलं बिंग नातेवाईकांसमोर आणि शेजाऱ्यांसमोर फुटण्याची भीती वाटल्याने संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं आणि पसार झाला.
हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती निफाड तालुक्यातील लासलगाव येथेही यावर्षीच घडली. एका महिलेवर पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या घटनेत महिला ५० टक्के भाजल्याची संतप्त घटना घडली.
घटनेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या आवारात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट येथे तरुण शिक्षिकेला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आज नाशिक जिल्ह्यात अशी घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.
प्राप्त माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. महिला ५० टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून मुख्यमंत्री बंदोबस्तात व्यस्त असलेल्या नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सदर महिलेस लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे हलविण्यात आले होते.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना राहता तालुक्यातील एकरुखे येथे नऊ महिन्यांपूर्वी घडली होती. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनिल लेंडे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सुनिल लेंडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सुनिल लेंडे हा पत्नी छाया (३२ ) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. पत्नीच्या नातेवाईकाचे निधन झाले असून ती माहेरी गेली असल्याचे आई – वडिलांना सांगितले.
त्यानंतर रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच जाळून टाकले. त्यानंतर स्वत:हून तो राहता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर छाया यांचा भाऊ सुनील तरस याच्या फिर्यादीवरून लेंडे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
हिंगोलीतल्या आडगाव मुटकुळे येथील २६ वर्षीय महिलेच्या पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार हिंगोलीतल्या आडगाव मुटकुळे येथे तीन दिवसापूर्वी घडला होता. दरम्यान महिलेचा आता मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव संगीता शंकर हनवते असे आहे. मागील आठ वर्षापूर्वी आडगाव मुटकुळे येथील शंकर याच्यासोबत गुगुळ पिंपरी येथील संगीताचा विवाह झाला होता.
घटनेच्या काही दिवसांपासून पती-पत्नीची कुरबुर चालू होती. यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यामध्ये पती शंकर याने पत्नी संगीताच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. संगीताला एक मुलगा व एक मुलगी आहे. किरकोळ कारणावरुन वाद विकोपाला गेला. त्यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. विवाहिता संगीता ही ७८% भाजली होती. त्यांच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान सायंकाळी तिची प्राणज्योत मालावली.
या घडलेल्या प्रकारानंतर पती शंकर हनवते, सासु कमलाबाई रामजी हनवते यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यूशी झुंज देत असलेल्या संगीताची आज प्राणज्योत माळवली असल्याने पोलीस आरोपी पती शंकर याचा शोध घेत आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत हत्त्याकांडाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, अशात ही घटना घडल्याने दिवसेंदिवस महिलांना पेटविण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे.
राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्यात. गुन्हेगारांवर वचक बसवणारा दिशा कायदा कधी येणार असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. महिन्याभरात धुळे जिल्ह्यात सामूहिक बलात्कार आणि हत्येची दोन प्रकरणं घडली आहेत. आता या बीडच्या प्रकरणानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर झालेला आहे हेच अधोरेखित झालं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून राज्य सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलावीत असे मत नोंदवले आहे.
हे का घडतंय याचे कितीही चिंतन केले आणि प्रबोधन केले तरीही अशा घटना सतत घडतात. तसेच ह्या घटना केवळ कोणत्याही एखाद्या राज्यातच घडतात असे नव्हे. एखाद्या देशातच घडतात असेही नव्हे. त्या सर्वत्रच घडतात किंवा त्यात काही फारसे आश्चर्य करण्याचे कारण नसते असे जर कुणी म्हटले तर ते अत्यंत वादग्रस्त विधान ठरेल. या विधानावरुन कुणी ट्रोलही होईल. सतत होणाऱ्या महिला भगिनींवरील अन्याय अत्याचारावरची भाषणे, मते, वादग्रस्त विधाने ही काही कामाची नाहीत. कायदा आहे पण फायदा आहे का काही? लैंगिक शिक्षण द्या किंवा मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन करा वर्षानुवर्षे काहीच फरक पडत नाही. लोकांत, लोकांच्या वागण्यात काही फरक पडत नाही. देश असो वा महाराष्ट्रासारखे म्हणविले जाणारे पुरोगामी राज्य! सगळीकडे एकच धडे आहेत.
घटनांचे फडे आहेत. शिक्षांच्या बाबतीत हुकुमशाही देशांतील तरतुदीचेच अनुकरण करणे योग्यच ठरावे, इतकी अशी ही परिस्थिती आहे. कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या नव्हे पण गुन्हा सिद्ध झाला की लगेच क्रुर शिक्षा व्हायला हव्यात. याबाबतीत मानवाधिकार आणि तत्सम विचारधारा ही विकारधाराच आहे. त्यामुळे शिक्षेची दहशत आवश्यक आहे. दिपावलीसारखा अतिआनंदाचा आणि उत्साहाचा सण. कोरोनाने इतकी माणसे मारल्याचे दु:ख बाजूला ठेवून इथली उत्सवप्रिय आणि विसराळू जनता फटाके फोडू नका, प्रदुषण करु नका असे आवाहन केले असतानाही आनंदाने सण साजरा करण्यात गर्क होती. पण अशा दीप उजळण्याच्या उजेडाच्या पावन पर्वावर दीपावली अज्ञानाविरुद्ध ज्ञानाचा दीप तेवणारी आहे की माणुसकीला जाळणारी आहे, हाच एक प्रश्न पडला आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
१६.११.२०२०