Post Views: 113
शिवसेनेतील अंतर्गत फाटाफूटीचा आणि एकुणच न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल लागला आहे. या निकालाने तो ज्या गटबाजीमुळे आमदारांच्या पात्र अपात्रेचा निकाल यावर आधारीत होता त्या महत्त्वपूर्ण विषयावर कायमचा पडदा पडला आहे. कारण ठाकरे आणि शिंदे गटाचे दोहोंचेही आमदार पात्र ठरले आहेत. यामुळे दोन्ही गटांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात त्यांची याचिका दाखल केली आहे. यामुळे हे प्रकरण अजून पुढे किती दिवस चालू राहणार आहे, याबद्दल काही सांगता येणार नाही पण हा न्यायालयाचा अवमान आहे असा दावा केला जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर दोन्ही गट आक्रमक झाले आहेत.
त्यांना सदरील निकाल मान्य नसल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी शिवसेना शिंदेंचीच असून ठाकरे प्रणित शिवसेनेची घटनाच मान्य नसल्याचे निकालात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही ठाकरेंच्या हाती राहिलेले नाही. शिवसेनेची २०१८ ची घटना ग्राह्य धरता आलेली नाही. तसेच पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येणार नाही एवढेच नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीशिवाय कुणालाही गटनेते पदावरून हटविण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाने भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना व्हिप बजावण्याचा अधिकार नसल्याचे या निकालाने सांगितले. ठाकरे गटाच्या कागदपत्रांतील त्रुटींमुळे शिंदे गटाची सरशी झाली आहे, हा या निकालाचा सार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलेला शिवधनुष्य सोडवून घेतला अशी प्रतिक्रिया दिली आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवून हा निकाल दिलेला आहे. मुळात हे प्रकरण अपात्रतेचे होते पण त्यांनी कुणालाही अपात्र केलेले नाही. ठाकरे गटासाठी घटनादुरुस्ती मान्य नसेल तर त्यांचे त्याच घटनेच्या आधारे धनुष्य बाणावर निवडणूक लढवून निवडून आलेले आमदार पात्र कसे असू शकतात ? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. घटना पायदळी तुडवली, बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हाती सोपवली असल्याचे उद्विग्न उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.
या निकालाने घराणेशाही मोडीत निघाली असून लोकशाहीचा आणि हिंदुत्वाचा विजय झाला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशाचप्रकारे जनतेतही दोन गट असून ठाकरे समर्थकांना उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे असे वाटते. हा लोकशाहीचा पराभव असून सुप्रीम कोर्टात लोकशाहीचा विजय होईल असे काहींना वाटते. तर स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी पक्ष कसा बदलावा किंवा पक्ष कायम ठेवून पक्षांतर कसे करावे याचा वस्तुपाठच घालून दिलेला असल्याचे लोक बोलत आहेत.
भविष्यात कोणता पक्ष फुटून कुठे जाईल आणि सत्तासंधान बांधेल हे सांगता येत नाही. असा पायंडाच पडेल आणि या निकालाच्या आधारावर पुढील काळात निकाल दिले जातील. राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवायचे असेल तर पक्षाची घटना, पक्षाची विचारधारा आणि विधीमंडळातील बहुमत या तिन्ही बाबींचा विचार केला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. तसे झालेले या निकालावरून दिसत नाही. यावरून आमदार अपात्रतेचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाले असल्याचे सिद्ध होते.
या प्रकरणाची सुरुवात दीड ते पावणेदोन वर्षांपूर्वी गुवाहाटीला शिवसेनेचे तीस ते चाळीस आमदार पळून जाण्याने झाली. गुवाहाटीच्या आलिशान हॉटेलात या सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी ‘काय झाडी काय डोंगर’ या लोकोक्तीचा जन्म झाला. हे इतके लोकप्रिय झाले की यावरून गाणी, जाहिराती तयार झाल्या. मग गोवा, सुरत असाही प्रवास झाला. ही सगळी मजा संबंध महाराष्ट्राने पाहिली. जेव्हा ते महाराष्ट्रात आले तेव्हा या फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. याआधी नैतिकतेच्या आधारावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला या एकाच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे यांना दोषी ठरवले.
बाकीच्यांचे म्हणजे राज्यपालासह सगळ्यांचेच चुकले असले तरी सरकार मात्र टिकले! अशा आशयाची म्हणच या निमित्ताने जन्माला आली. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. ठाकरे गटाच्या नोटीशीप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचे सादर केलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत नसल्याचे नार्वेकर यांनी निकालात म्हटले आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुनच दिलेला आहे असे सांगतानाच सरकार जसे तरले त्याप्रमाणे दिलेला निकाल चुकीचा नाही तर तो शाश्वत आहे असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार ज्यांनी पहाटेचा शपथविधी सोहळा घडवून आणला होता ते काही आमदारांसह भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलेल्या खेम्यात दाखल झाले आणि उपमुख्यमंत्री झाले. आता जनतेच्या मनात छोटे छोटे प्रादेशिक पक्ष भाजपाला नष्ट करायचे आहेत किंवा त्यांचे महत्त्व खूप कमी करायचे आहे ही भावना अधिकच अधोरेखित झाली. राष्ट्रवादीच्या बाबतीत असेल की नाही माहीत नाही पण शिवसेनेच्या बाबतीत जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झालेली आहे. कारण शिवसेना फोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत झालेली महाविकास आघाडी भग्न करणे एवढेच उद्दिष्ट भाजपाचे नव्हते तर सत्ता हस्तगत करणे हेही मुख्य उद्दिष्ट होते. कारण पहाटे झालेल्या शपथविधीने राजकारणातील खेळी भाजपाच्या जिव्हारी लागली होती तर पुढील मोठी खेळी अत्यंत गोपनीय पद्धतीने भाजपाने खेळली गेली.
अगोदर भाजपाच्या मते अभद्र युती करणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले तर सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तर हजार कोटी रूपयांचा घोटाळा बाहेर काढण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीलाही रितसर फोडण्याचा करेक्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच प्रक्रियेतून जात आहे. शिवसेनेचा जसा निकाल लागला तसाच राष्ट्रवादीचा न लागला तरच नवल! तो तसा अपेक्षितही आहे परंतु अनेकवेळा फुट पडून सावरलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा अधिक सहानुभूती मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या कमी अधिक अडचणीसाठी शरद पवार भक्कमपणे उभे आहेत. राष्ट्रवादीची फूट घरातच पडल्यासारखी आहे. तसे शिवसेनेत नाही. मोठ्या कष्टाने आणि अनेक समस्यांना सामोरे जात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली होती. त्यांच्या नंतर संघटनेत अशाप्रकारे दुफळी माजून ती रसातळाला जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही जनतेच्या मनात तयार झाली तर त्याचेही नवल वाटू नये.
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच महापत्रकार परिषद घेतली. यात नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची अक्षरशः चिरफाड केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ असिम सरोदे यांनी निकालातील मोठ्या चुका जनतेसमोर आणल्या आहेत. उद्धव ठाकरे हे मी आता जनतेच्याच न्यायालयात जाणार असे म्हणतायेत. येत्या निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी उभी राहील असे त्यांना वाटते. कारण आमच्यावर स्वार्थी राजकारणामुळे अन्याय झालेला आहे हे जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे, असे त्यांना ठामपणे वाटते. जनता दिसते तेवढी दुधखुळी नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेची विविध कारणांमुळे पडझड झाली. पण शिवसेना यातून खंबीरपणे उभी राहिली होती. असे आता आणि भविष्यात काही विपरीत घडण्याची शक्यता किंवा धडा घ्यायला हरकत नव्हती. तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या काळात उद्वव आणि आदित्य हेच शिवसेनेचे वारसदार आहेत हे जाहीर केले होते. बाबासाहेबांवर शिवसैनिकांची अढळ श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत शिवसेना आणि उद्धव, आदित्यला सांभाळले. पण सत्तेपासून दूर राहणाऱ्या ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद आल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता पसरली. ही अवस्था भाजपाने हेरली.
कोरोना काळ असल्यामुळे योग्य वेळ येण्याची सर्वचजण वाट पहात होते. ती योग्य वेळ आली आणि पुढे काय काय घडले हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहेच. आता नव्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल तो लागेल पण निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात जाण्याचे ठाकरेप्रणित शिवसेनेचे ठरले आहे. पक्षाचे नाव किंवा चिन्ह महत्त्वाचे नसून जनता कुणाला कौल देईल हे महत्त्वाचे आहे. स्वार्थी राजकारण करणारे इकडे तिकडे पळत असतात. निवडणुकीच्या वेळी अजून काय फेरबदल होतील; हे सांगता येत नाही. अजितदादाही गेलेल्या सर्वांना घेऊन मोठ्या साहेबांकडे येऊ शकतात, शिंदे गटातील काही नाराज पुन्हा स्वगृही परतू शकतील किंवा भाजप या दोन्ही गटांशी युती करुन निवडणुक लढवू शकेल. उद्धव ठाकरेंनी ज्यांची संभावना गद्दार म्हणून केली त्यांना सामावून घेतले जाईल किंवा कसे हे आत्ताच स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. मात्र पुढील निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि मित्रगट असतील असे चित्र सद्या तरी आहे.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३.