वदनी कवळ घेता…. विचारधन

 

 

 

अन्नदान म्हणजे जीवनदान देण्या सारखे आहे हे दान श्रेष्ठ व पुण्यकारक मानले जाते, अन्नदान केल्याशिवाय कोणतेही विवाह सोहळे, साखरपुडे, जप ,तप ,यज्ञ, सप्ताह, काला पूर्ण होत नाहीत .अन्नदान हे शरीराला व आत्म्याला तृप्त करते ;म्हणून ते करावे असे जनसामान्यात अगोदरपासूनच रीतीरिवाज आहे ,अन्नदान नेहमी करावे ,आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखी आहेत काय?याचा विचार करून अन्नदान करावे, अन्नदान केल्याने 21 पिढीचा उद्धार होतो व आपण शिवलोकात जातो असा समज आहे, अन्नदानात दाता व भोक्ता दोघेही संतुष्ट होतात. सध्या अनेक ठिकाणी विवाह सोहळे सुरू आहेत,त्यामध्ये अन्न वाया जात आहे .अन्नदान केल्याने सर्व पापाचा नाश होतो ;असे आपण म्हणतो, परंतु अन्नदानाबरोबरच अन्नाची नासाडी होत आहे. त्यासाठी हा लेखन प्रपंच-……

 

प्रकृती म्हणजे जेवढी भूक आहे तेवढेच खाणे होय. विकृती म्हणजे जेवढे भूक आहे, त्यापेक्षा जास्त खाणे होय. आणि संस्कृती म्हणजे आपल्या जेवणातील दोन घास भुकेलेल्यांना खाऊ घालणे होय. अशी आपण सरळ व्याख्या करतो. माणूस दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हिंडत- फिरत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांना तो हजर असतो. विवाह, स्नेहसंमेलन ,वाढदिवस, इतर सुखदुःखाच्या गोष्टीसाठी तो जात असतो, परंतु तिथे गेल्यानंतर चहा,पाणी, नाश्ता आणि नंतर जेवण मिळते, त्यामुळे त्यांची भूक कमी झालेली असते, अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते कोणी ही वाया घालू नये असं सांगितलं जाते. आज मानवी जीवन काही भागात अन्नासाठी भूक भूक म्हणून मरत आहेत, कोणी वरिष्ठा मागून आपले पोट भरत आहे, तर कोणी अवघड कामे करून या पोटाची खळगी भरत आहेत. काही जण मंदिर, मशिदी, चर्चजवळ बसून भीक मागून या पोटाला शांत करत आहेत. अनेक याचक केविलवाणे चेहरे करून रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी बाजारात भीक मागताना दिसतात. *मुखी घास घेता करावा विचार। कशासाठी हे अन्न मी सेविनार*।।असे वाक्य आपण ऐकतो मंगल प्रसंगी पाहुणे मंडळींना आग्रह करून भोजन वाढले जाते .आणि ताटात अन्ना शिल्लक राहते.

एका बाजूला पाहिले तर कुपोषित बालके किती तरी अन्ना वाचून मरत आहेत, त्यांना एक वेळी खाण्यासाठी अन्न नाही .अन्न अन्न म्हणून ते जीव सोडले, पण दुसऱ्या बाजूला अन्नाची नासाडी केली जात आहे. बरेच पदार्थ ताटामध्ये ठेवून अनेक लोक तसेच उठून बाजूला होतात. अन्न हे वाया घालून काय उपयोग होतो? याचा प्रत्येकाने विचार करावा *वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे*

*जीवनकरी जीवित्व अन्न हे पूर्णब्रह्म* । *उदर भरणे नव्हे जाणिजे यज्ञ कर्म*

।।ह्या ओळी ऐकताना खरोखरच आपलं हृदय भरून येते.परंतु आज दुर्गम भागात फार मोठी समस्या निर्माण झाली. कुपोषित या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळत आहे.
या पुढील काळात भोजनासाठी स्वेच्छा भोजन ठेवावे, त्यामुळे जेवढा आपल्याला अन्न लागेल तेवढेच पदार्थ वाढून घेता येतील, पदार्थ जास्तीत जास्त करू नयेत, जेणेकरून त्यांची संख्या कमी असावी, बनवलेले सर्व अन्नपदार्थ खाल्ले जात नाहीत व ते संपत नाहीत. वाया जाणाऱ्या अन्नापेक्षा गरजूंना व भुकेल्यांना अन्न द्यावे. अलीकडील काळामध्ये उरलेले अन्न उघड्यावर कचराकुंडीत फेकून दिले जाते,खराब झालेले अन्न परिसरात दुर्गंधी पसरते म्हणून आपल्याला जेवढी लागली तेवढी पुरी, चपाती, भाकरी, भात गुलाब जामुन ,बुंदी, भाजी हे पदार्थ तुम्ही लागेल तेवढे घ्या़. परंतु नासाडी होऊ देऊ नका. अन्न शिजवणाऱ्या, चपाती करणाऱ्या, भाजी चिरणाऱ्या, अन्न वाढणाऱ्या, भांडे घासणाऱ्या अशा अनेक व्यक्तीचे कष्ट या भोजनात असतात.

 

म्हणून अन्न हे कधीही वाया जाऊ देऊ नका ? जेवणाऱ्या लोकांचा खूप आग्रह करू नका. जेवताना लोक जे मागतात ते पदार्थ त्यांना ताबडतोब द्या. लोक पोटभर जेवतात. हवे ते मागून घेतात. त्यांना जास्तीचे अन्न तुम्ही कोणीही वाढू नका. अलीकडील काळामध्ये *वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूमीचे । सहज स्मरण होते आपल्या बांधवाचे। कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात । श्रमिक श्रम करूनि वस्तू त्या निर्मिंतीत।।स्मरण करूनि तयांचे अन्नसेवा खुशाल। उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल।।* या काव्यपंक्तीतून आपल्याला या मातृभूमीची आपण काहीतरी देणं लागतो; म्हणून कष्ट करणाऱ्या पिढी त्यांना शोषितांना अन्नाची गरज आहे. परंतु जिथे अन्न पोहोचत नाही त्या भागात त्यासाठी आपण जेवणाची पाकिटे तयार करून देता येतील का❓ याचा विचार करता येतो. आजही अनेक मंगल कार्यामध्ये भिकारी जेवणाची वाट बघत बसत बसतात. केव्हा जेवायला मिळेल असे त्यांना झालेले असते .काही अन्नाची लोभी लोक कार्यक्रमात फिरून येतात आणि अशा ठिकाणी जेवण्याचा आनंद लुटतात. आपण आज एका बाजूला महासत्ता होत असलो तरी आपली अर्थव्यवस्था सुधारत असली तरी आणखीही सामाजिक परिवर्तन म्हणावे तेवढे झाले नाही.

 

दवाखान्यांमध्ये पेशंट असणाऱ्या लोकांना सुद्धा काही ठिकाणी वेळेवर अन्न , चांगले व सकस अन्न मिळत नाही, कसेतरी दिवस काढावे लागतात. पंढरपूर, शिर्डी, शेगाव
अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर भक्तांना अन्नदान केले जाते, योग्य मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातूनच दान करावे. ते दान सत्कर्मी लागते म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी *भुकेलेल्या अन्न द्या* असे म्हणून त्यांनी अन्नछत्रे काढले, दानाची वाच्यता करू नये, उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू नये ,असा समज आहे. त्यालाच दान म्हणतात, पहिला घास घेते वेळेस शेतकऱ्यांचे आभार मानावेत, म्हणून अन्नाची नासाडी होऊ देऊ नका.अन्न वाया घालू नका ,हाच या
लेखाचा मुख्य संदेश आहे .

शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *