शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले –अशोक चव्हाण

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले –अशोक चव्हाण


मुंबई;
राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे एक अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचली तेव्हा अतिशय आनंद झाला होता. खंबीर, दृढनिश्चयी असलेले निलंगेकर साहेब पु्न्हा लवकरच घरी परततील, अशी अपेक्षा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक प्रदीर्घ पर्व संपुष्टात आले.
विद्यार्थी दशेतच त्यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामात उडी घेतली होती. स्वातंत्र्याचा हा लढा संपल्यानंतर त्यांनी स्वतःला लोकसेवेसाठी वाहून घेतले. एक आमदार ते मुख्यमंत्री या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी नेहमी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. विशेषतः सिंचन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. शिक्षण संस्था उभ्या करून लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची गंगा आणली.
अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर व चारित्र्यसंपन्न नेते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता. गावागावातील कार्यकर्त्यांना ते अगदी नावानिशी ओळखायचे. नव्वदीत असतानाही ते अनेकदा काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या बैठकींना हजर रहायचे. आम्हाला मार्गदर्शन करायचे. पुढील काळात त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवत राहिल, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *