मला कुणी “डायमंड” म्हणजे काय? अस विचारल तर मी आजच्या दिवशी आत्मविश्वासाने सांगेन, माजी शिक्षण संचालक श्री गोविंद नांदेडे… म्हणजे डायमंड….त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले काम इतकेच तेजस्वी आहे.
मित्रानो… नांदेडे सरांनी राज्याचे शिक्षण संचालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर जे काम सुरू केलं आहे. ते…तुम्हाला माहिती झालं… तर तुम्ही म्हणाल, कल्याणकर नांदेडे सरांविषयीचे तुमचे निरिक्षण चुकले. नांदेडे सर तर हिऱ्यांची खाण पेरणारे माणस आहेत…
यंदाची दिवाळी कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने गावोगावी साजरी केली गेली. कुठे फारसे फटाके फुटले नाहीत. का कुठे मोठ्या प्रमाणात रोशनाई केली गेली नाही.
नांदेड जिल्ह्यातील शिराढोन या गावाने गावातील प्रत्येक घरातून एक सनदी अधिकारी देशाला देण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून स्पर्धा परिक्षा पुर्व तयारी महोत्सव साजरा केला. स्पर्धा परिक्षा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात लागणारे पुस्तक खरेदी केले.
गावातील प्रत्येक माणूस जिद्दीने कामाला लागला आहे. मुलं- मुली, तरूण – तरूणी, विद्यार्थी यांच्या आनंदाला तर पाराच उरला नाही. बालमनावर चांगले संस्कार व्हावेत. यासाठी नांदेड जिल्ह्यातून स्पर्धा परिक्षेत नुकतेच यशस्वी ठरलेले तरूण सनदी अधिकारी निमंत्रीत करण्यात आले होते. या उपक्रमाचे उगमस्थान म्हणजे श्री नांदेडे सर आहेत. हे मी सांगायची गरज नाही.
शिराढोण गावकऱ्यांचा दिवाळी संकल्प देशातील लाखो गावांना मार्गदर्शक ठरावा असा आहे. शिराढोणकरांना माझ्या शुभेच्छा…!
आनंद कल्याणकर,पत्रकार