एक ओबीसी, नेक ओबीसी !


•••

अलीकडे ओबीसी आंदोलनाची तीव्रता बऱ्यापैकी वाढलेली दिसते. लोक ओबीसी म्हणून रस्त्यावर यायला लागले आहेत. तशी ही नक्कीच समाधानाची बाब आहे. त्यासाठी मोकळ्या मनानं सर्वांचं अभिनंदन करायला हवं !

संघटना वेगवेगळ्या आहेत. नेते आणि त्यांचे उद्देश पण वेगवेगळे आहेत. काहींचे नेते गोंधळलेले आहेत ! मागण्या वरवर पाहता सारख्या वाटत असल्या, तरी त्यात विरोधाभास आहे. काही फसव्या देखील आहेत. सरळ सरळ ओबीसींची दिशाभूल करणाऱ्या आहेत. उदा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. ही मागणी !

आता ह्या मागणीमधील मखलाशी बघा..! मुळात ५२ टक्के ओबीसीला गडचिरोली मध्ये ६ टक्के, चंद्रपूर मध्ये ७ टक्के, काही आदिवासी जिल्ह्यात ११ टक्के असे आरक्षण आहे. म्हणजे मग या तथाकथित ओबीसी नेत्यांना हे कबूल आहे, असा त्याचा अर्थ होत नाही का ? ही समाजाची फसवणूक नाही का ?

ह्यातले काही ओबीसी नेते (?) तर स्वतः सत्तेमध्ये आहेत. आणि वरून पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना सांगणार ‘कलेक्टर कडे जाऊन निवेदन द्या. तहसीलदाराला निवेदन द्या. स्वतःवर केसेस लावून घ्या.’ ही सारी नौटंकी कशासाठी ? हे लोक सरकारमध्ये राहून मग नेमकं काय करतात ? बरं निवेदन, धरणे, मोर्चे दर वर्षी, पुन्हा पुन्हा कशासाठी, कितीवेळा ? त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढं साधं कळत नसेल का ? की कळत असूनही ते चूप आहेत ? मग एवढी लाचारी कशासाठी ? नुसते आमदार, खासदार, मंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी ?

लोकजागरची लढाई मुळात अशा मानसिक लाचारी विरुद्ध आहे. नेते नौटंकी करतात आणि आम्ही त्यांचा उदोउदो करतो, या मूर्खपणा विरुद्ध आहे..! सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय शोषणाविरुद्ध आहे. विषमते विरुद्ध आहे. त्यातल्या दांभिकपणा विरुद्ध आहे !

केवळ जाती, धर्माच्या आधारावर आपण कुणालाही आपला नेता मानू नये. सत्ता, संपत्ती, जात, धर्म बघून कुणालाही मोठं किंवा छोटं मानू नये ! कोणताही जाती समुह सरसकट चोर किंवा सरसकट थोर अशी मांडणी ज्यांच्या मेंदूत घट्ट बसली असेल, अशा लोकांची मला किळस येते. असे लोकच समाजाचे खरे शत्रू आहेत !

आपण त्यावर स्वच्छ मनानं विचार करावा, एवढीच विनंती आहे. पटलं नाही तर सोडून द्या. पण पटत असेल तर मात्र चूप बसू नका. आमच्या सोबत या ! हिम्मत करा. भिंतीवर, बॅनरवर महापुरुषांचे फोटो आणि बसता उठता त्यांच्या नावाचा कोरडा जयघोष करून काही उपयोग नाही ! ते सुद्धा शुद्ध ढोंग आहे..! आपण महापुरुषांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत का, हा खरा प्रश्न आहे !

तोच प्रकार आपल्या मोर्चातील, आंदोलनातील घोषणांचा ! एक अमूक तमूक..लाख अमुक तमुक असल्या घोषणा देखील बालिश आहेत. उन्मादी आहेत. पोकळ आहेत ! अमुक – तमुक असाल.. तर मोर्चात दिसाल ही आणखी एक बावळट घोषणा ! ही तर थेट मूर्खपणाची आहे ! इतरांना डिवचण्यासाठी देण्यात येणारी ही घोषणा चक्क आपल्याच आई, बापाची, कुटुंबाची हेटाळणी करणारी आहे, हेही आमच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही ! म्हणजे बघा..अशी घोषणा देणाऱ्या नेत्यांचे झाडून सारे नातेवाईक किंवा आई, वडील मुलं वगैरे अशा मोर्चात किंवा मोहिमेत सामील असतात का ? आणि नसतील तर मग.. ? त्याचा अर्थ नेमका काय होतो ? त्यातील कुत्सितपणा, त्यातील टोमणे किंवा सौम्य निषेध तुमच्या स्वतःच्या आई वडिलांना देखील लागू होणार नाही का ?

मुळात असल्या ह्या भंपक घोषणा सर्वात आधी ज्या कुणाच्या डोक्यात आल्या असतील, तो मेंदू अर्धवट तरी असला पाहिजे किंवा कारस्थानी तरी असला पाहिजे ! आणि त्यावरही ताण म्हणजे त्यांचा हा मूर्खपणा आम्ही आमच्या आंदोलनातून अभिमानानं मिरवयाचा का ? एवढा साधा विचार जर आम्हालाच कळत नसेल, तर आम्ही समाजाला दिशा कशी काय देणार ?

लोकजागरची लढाई अशी उसनवारीची नाही.. अस्सल आहे, प्रामाणिक आहे ! (? आता आमची कॉपी करायला लागले आहेत. त्यांनीही उगाच अशी मोडतोड करण्यापेक्षा लोकजागरच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला काय हरकत आहे ? आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करू )

लोकजागरचा जाहीरनामा फक्त अकरा कलमांचा आहे. त्या अकरा कलमामधील एक एक शब्द चिंतनातून आलेला आहे. त्यात दीर्घकालीन निती दडलेली आहे. आमचा संपूर्ण जाहीरनामा फक्त ४६ शब्दांचा आहे.

लोकजागर अभियान अकरा कलमी कार्यक्रम
१. झिरो ते हिरो अर्थव्यवस्था !
२. जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही !
३. गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार !
४. कृषी धर्म, कृषी संस्कृती !
५. सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार !
६. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य !
७. एक गाव, एक परिवार !
८. शंभर युवा, महाराष्ट्र नवा !
९. गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय !
१०. प्रगत महिला, समर्थ समाज !

११. सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता !

मुळात आठवं कलम, युवा भारत, नवा भारत असं आहे. पण महाराष्ट्राचा विचार करता, त्यात शंभर युवा, महाराष्ट्र नवा असा बदल केलेला आहे. आमची ही अकरा कलमं म्हणजे केवळ ४६ शब्द नव्हेत ! सामाजिक क्रांतीचा दारूगोळा एका एका शब्दात ठासून भरला आहे ! सामाजिक उत्थानाचा नवा महामंत्र आहे !

ओबीसी जनगणना सत्याग्रहाची त्रिसूत्री देखील अगदी स्पष्ट आहे. कुठल्याही बाबतीत संभ्रम नाही. आमची जनगणना आम्हीच करणार हा सत्याग्रह पुरेसा पारदर्शी आणि सुस्पष्ट आहे !

• ५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण !
• ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार !

• राजकीय समतेसाठी, सत्तापरिवर्तन !

आम्हाला दुटप्पी लोक नको आहेत. त्यापेक्षा त्यांनीच स्वतः दूर झालेलं बरं ! तेव्हा..प्रामाणिकपणे विचार करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. सोबत यायचं असेल तर मनापासून या ! स्वच्छ मनानं या ! जमेल तेवढाच भार उचला. वाटेल तेवढंच सहकार्य करा ! पण जे काय कराल, ते मनापासून करा ! उगाच तोंडदेखलेपणा करू नका ! शत्रु पेक्षा अशा दुटप्पी मित्रामुळे जास्त नुकसान होते, याची आम्हाला जाणीव आहे ! त्यामुळे आम्हाला माफ करा ! आम्हाला कोणत्याही दिखाऊ गोष्टी करायच्या नाहीत. कोणत्याही पोरकट किंवा बिनडोक घोषणा द्यायच्या नाहीत !

आणि म्हणून..घोषणाच द्यायची असेल, तर..
एक ओबीसी, नेक ओबीसी

अशी नवी घोषणा मी देईन. एकेक माणूस, एकेक ओबीसी, एकेक बहुजन जर सचोटीनं, नेकीनं वागायला लागला, तर साऱ्या समस्या क्षणात सुटतील. मग कुणाच्या विरुद्ध बोंब मारण्याची गरज पण पडणार नाही !

त्याचाच पहिला टप्पा आहे – ओबीसी जनगणना सत्याग्रह..! आणि सत्याग्रहाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे, ही पहिली कसोटी आहे ! तेव्हा.. इतर संघटनांनी देखील त्यांच्या त्यांच्या मूळ घोषणेत हा नवा बदल स्वीकारायला काय हरकत आहे ?

इतरांचं जाऊ द्या.. आपण मात्र..
एक ओबीसी, नेक ओबीसी

या निर्धारानं पुढं जाऊ या..! लोकजागरची हीच खरी ओळख व्हावी, असेच वागू या.. तसेच जगू या !

तूर्तास एवढंच..


ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
•••
संपर्क –
एमएस मिरगे
महासचिव
लोकजागर अभियान
• 9004397917 • 9545025189 • 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116 •

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *