माझी शाळा ;श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ

जिच्यामुळे इथपर्यंत पोहचलो तिच्या आठवणींना उजाळा आणि तिच्या कायपालटाची केविलवाणी आस..

जीवनाच्या पहिल्या टप्प्यातील पदार्पण करून अ,ब,क,ड चे धडे जि. प. च्या शाळेत गिरवून A,B,C,D चा मुळवा मजबूत करत पायाभरणी करण्यासाठी आणि ज्ञानार्जनाचे धडे गिरवण्यासाठी ज्या वास्तूत प्रवेश केला होता ती हीच इमारत , हेच ते ज्ञान मंदिर…

त्या ज्ञान मंदिराचे नाव श्री बसवेश्वर विद्यालय , जी आज घडीला पूर्णपणे मोडकळीस आली असून सद्यस्थितीत ती ओसपडल्यागतच झाली म्हटले तर वावगे ठरणार नाही.

याच वास्तूच्या आवारात ता.२६ नोव्हेंबर २०२० रोज गुरुवारी सहजच बराच वेळ निवांत बसण्याचा योग आला. त्याच निमित्त होत फुलवळ चे माजी सरपंच मारोतराव मंगनाळे यांच्या अंत्यविधीस जाण्यासाठी गेलो असता अंत्यविधीस वेळ असल्याने सहजच उगाच श्री बसवेश्वर विद्यालयाच्या जुन्या इमारतीच्या आवारात जुन्या ऑफिस च्या समोरील ओट्यावर जाऊन बसलो.

बसल्या ठिकाणी स्वतःच बालपण आठवत शालेय दिवस , तेंव्हाच्या घडामोडी आणि मला शिकवलेल्या गुरुजनांच्या मनमुराद आठवणी ताज्या करत बसलो.

खूप काही ऋणानुबंधाच्या आठवणींचे काहूर सारख सभोवताली भिरभिरतच राहिले , मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी प्रत्येक वर्गखोलीची एक एक आठवण सैरावैरा फिरत बाहेर पडत होती. आणि नकळतपणे पूर्णपणे बालपणातच मी ही हरवून गेलो.

मनाला वाटलं हीच ती इमारत , जिने अनेक डॉक्टर , इंजिनिअर , शिक्षक, गुत्तेदार , अश्या अनेक विविध पदापर्यंत चे विद्यार्थी दिले. अनेकांना नावारूपाला आणले , अनेकांचं जीवनमान बदलून गेले ते याच चार भिंतीच्या इमारतीमुळे.

पण याच इमारतीची आजघडीला दयनीय अवस्था झाली असून याच इमारतीत कार्यरत असलेली श्री बसवेश्वर विद्यालय ही शाळा काही वर्षांपूर्वीच एका टोलेजंग इमारतीत स्थलांतरित झाली हे अभिनंदनियच , कारण ही जुनी इमारत दिवसेंदिवस जीर्ण होत होती त्यामुळे कधीही अनपेक्षित धोका होऊ शकला असता हे संभाव्य होतेच , त्यामुळे इमारत बदलनेही काळाची गरजच होती.

परंतु या जुन्या इमारतीकडे दुर्लक्ष करून चालणार तरी कसे , ही गावची सार्वजनिक मालमत्ता , मग ती संभाळणेही गावकऱ्यांचे कर्तव्य आहेच की , त्यामुळे मनात आलेला एक छोटासा केविलवाणा प्रयत्न मी मांडतोय , जर याच श्री बसवेश्वर विद्यालयातून शिकून गेलेल्या माजी , आजी विद्यार्थ्यांना किंवा गावातील जाणकारांना तो पटला तर नक्की सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न केला तर नक्कीच याच मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी नव्याने भव्य वास्तू आपण उभारू शकतो आणि समस्त गावकऱ्यांच्या उपयोगी वापरात आणू शकतो.

त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावाच लागतो , माझ्यामते आपल्या इथे अश्या सार्वजनिक कामासाठी अनेकजण जाणकार आणि उत्साही आहेतच पण समोर कोणी येत नाही.

तेंव्हा माजी , आजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करून आणि या ऋणानुबंधाचे आपणही काहीतरी देणे लागतो याचा विचार करून सर्वानुमते जमेल त्या पध्दतीने आर्थिक पुंजी गोळा करून या मोडकळीस आलेल्या जीर्ण इमारतीचा कायापालट करायचे ठरवले तर ते आपण नक्कीच करू शकतो , कारण गावात एखादा वैयक्तिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर तशी वास्तू कुठेच उपलब्ध नाही त्यामुळे आपणच अनेक कार्यक्रम बाहेरच्याना अवाढव्य भाडे देऊन अनेक कार्यक्रम घेत आहोत.

तेंव्हा मी माझा एक छोटासा विचार मांडला , जर आपल्यापैकी कोणाला पटला तर नक्की विचार करावा आणि आपल्या संपर्कातील मित्रांना , शेजाऱ्यांना तसे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण एक भव्य वास्तू याच जागेवर उभारू शकतो यात शंका नाही. त्यासाठी सर्वांनी एकमत करून राजकारणाला बाजूला सारून पुढाकार घेतला आणि तळमळीने संकल्प केला तर नक्कीच एक नाविन्यपूर्ण वास्तू या ठिकाणी उभारले असेच मला वाटते.

पटले तर स्वीकारा नाहीतर नाकारा , पण विचार मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून मी माझा विचार मांडला…

पूर्ण वाचन करून नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात..

याच शाळेचा मी एक विद्यार्थी.

धोंडीबा बाबाराव बोरगावे

फुलवळकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *