प्रतिनिधी, कंधार
येथील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने बुधवारी २ डिसेंबर रोजी पंचायत समिती, कंधारचे गटविकास अधिकारी यु.डी. रहाटीकर हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सहपत्नीक सत्कार करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कंधार येथील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने बुधवारी २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पंचायत समितीच्या कै.वसंतराव नाईक सभागृहात गटविकास अधिकारी यु.डी.रहाटीकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ.लक्ष्मीबाई पाटील घोरबांड, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापतीचे प्रतिनिधी पंजाबराव पाटील वडजे, प.स.सदस्य उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे, दत्ता पाटील घोरबांड, ग्रामसेवक संघटनेचे नेते अरुण चौधरी, सौ.सुरेखाताई रहाटीकर, प्रविण रहाटीकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कंधार पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी यु.डी.रहाटीकर यांना ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची प्रतिमा भेट देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक संघटनेचे कंधार तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी केले. त्यांनी गटविकास अधिकारी यु.डी.रहाटीकर यांचा अल्पपरिचय सांगून त्यांच्या कार्य पद्धतीवर प्रकाश टाकला. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, विविध गावचे सरपंच व उपसरपंच, कृषी विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जि.प.बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.जी.आदमपुरकर यांनी केले. तर आभार ग्रामसेवक विलास कल्हाळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेवक संघटनेचे कोषाध्यक्ष एस.एस.विश्वासराव, उपाध्यक्ष गोपाळ टोकले, परमेश्वर पांडागळे, सौ.लता चिंचकर, सहसचिव कैलास चोंडे, कार्याध्यक्ष एस.यू.घोरबांड, मानद अध्यक्ष विलास नारनाळीकर, सल्लागार जे.एस.घटकार, संघटक जे.पी.मुंडकर, सौ.राधा पोटे, प्रसिध्दी प्रमुख एस.एन.गिरी सदस्य परमेश्वर कागणे, सौ.एम.एस. जामगे, सौ.श्यामबाला डोईजड, हणमंत डावकरे, रोहिदास टेंभुर्णे आदींनी परिश्रम घेतले.