जवळा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम; घरी राहूनच अभिवादन करण्याचा दिला संदेश
नांदेड – प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांना अभिवादन करणारी पत्रे चैत्यभूमीला पाठवली जात आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान तसेच दक्षिणेकडील काही राज्यांतून हे अभियान सुरू झाले आहे. डोंबिवली येथील आंबेडकरी कार्यकर्ते किरण शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानास मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पोस्टकार्डे स्वत:च्या अक्षरात लिहून चैत्यभूमी, मुंबईकडे रवाना केली आहेत.
या पोस्टकार्डच्या माध्यमातून ‘घरीच राहून बाबासाहेबांना अभिवादन’ हा संदेश दिल्यामुळे सदरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी जमा होतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्रप्रवर्तन दिन साधेपणाने आणि घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच आता राज्यातील लहान मोठ्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी पाहता बाबासाहेबांना घरीच राहून अभिवादन करण्यात यावे असे प्रशासनाने कळवले आहे. त्याला प्रतिसाद देत जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी बाबासाहेबांप्रती कृतज्ञता आणि अभिवादन व्यक्त करणारी पत्रे लिहून चैत्यभूमी स्मारक, दादर (प)., मुंबई- ४०००२८ या पत्त्यावर पाठवून दिली आहेत. देशभरातून जवळपास तीन ते पाच लाख अभिवादन पत्रे येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या अनोख्या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करताच चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात कल्याणी शिखरे, किरण कदम, लक्ष्मण शिखरे, सृष्टी शिखरे, कृष्णा शिखरे, साक्षी गच्चे, अंजली झिंझाडे, अक्षरा शिंदे, अक्षरा शिखरे, शुभांगी गोडबोले, अक्षरा गोडबोले, साक्षी गोडबोले, निशा गोडबोले, मुस्कान पठाण, दीपाली गोडबोले यांच्यासह अनेक मुलामुलींनी सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब गोडबोले, रविकांत गच्चे, हैदर शेख, तुकाराम गोडबोले यांची उपस्थिती होती. ही मुले आता उर्वरित विद्यार्थ्यांना व नातेवाईकांना ‘घरीच राहून अभिवादन’ या पत्राद्वारे अभिवादन करण्याच्या अभियानात सहभागी होण्यास प्रवृत्त करणार असल्याचे मुख्याध्यापक ढवळे यांनी सांगितले.
काय लिहिले आहे पत्रात?
‘प्रिय बाबासाहेब, तुमच्यामुळे आमची कुळी उद्धारलीं. शिक्षणामुळे आमचे कल्याण झाले. तुमचाच आदर्श घेऊन मी खूप खूप शिकणार. खूप पुस्तके वाचणार. कोरोनाकाळामुळे सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी आम्ही येऊ शकत नाही. तरी माझे शब्दरुपी अभिवादन स्विकारावे, ही विनंती. जयभीम. ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपणास विनम्र अभिवादन!’ असा मजकूर असलेली स्वलिखित पोस्टकार्डे जवळा देशमुख येथील विद्यार्थ्यांनी चैत्यभूमी स्मारक समितीला पाठवली आहेत.