आज ६ डिसेंबर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वपक्षीय नेत्यांनी ट्वीट करत अभिवादन केलं.
प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना उद्या महापरिनिर्वाण दिनी (दिनांक ६ डिसेंबर, २०२०) अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात आले. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी युट्युब, फेसबुक, ट्विटरवर लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर असणाऱया ‘प्रकाशन’या सदराखाली ई-पुस्तके या विभागामध्ये ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती पुस्तिका २०२०’या नावाने उपलब्ध आहे.
देशातील तमाम मागासवर्गीयांच्या ७० हून अधिक पिढ्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत आणि स्वाभिमानाचे अंकुर फुलविणाऱे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटल्याचे चित्र चैत्यभूमी आणि दादर परिसरात पाह्यला मिळाले. काल रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनुयांयाबरोबरच देशातील झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येतात.
दादर स्टेशनहून चैत्यभूमीला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जब-तक चाँद रहेगा- बाबा तेरा नाम रहेगा सारख्या अनेक घोषणा देत मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी जातात. अनेक सामाजिक संघटनांकडून अभिवादन रँली काढण्यात येते. त्या रँलीही शिस्तबध्द रितीने चैत्यभूमीकडे जात असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या, त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,” असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच अनेक सामाजिक संघटनांनी आणि नेत्यांनीही केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण करोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले होते.
कोरोना संसर्ग पसरु नये. यासाठी खबरदारी म्हणून अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर न येता ऑनलाईन प्रक्षेपणातून अभिवादन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. अनुयायांनी त्यास शंभर टक्के प्रतिसाद दिला. चैत्यभूमीसह लगतच्या परिसरात अनुयायांची दरवर्षी दिसणारी प्रचंड गर्दी यंदा झाली नाही. सरकारने तसेच महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला संपूर्ण प्रतिसाद देऊन अनुयायांनी सर्वांसमोर अनोखे उदाहरण ठेवले आहे.
सह्याद्री वाहिनीवरुन चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, महापालिकेचे यूट्यूब, फेसबूक, ट्विटरवरुनही चैत्यभूमीसह राजगृह येथील अभिवादनाची थेट प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली. अनुयायांना आपापल्या घरी राहून चैत्यभूमीचे दर्शन घेणे व अभिवादन करणे शक्य झाले.
चैत्यभूमी येथे मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. शासनाच्या वतीने शासकीय मानवंदना प्रदान करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि महापालिकेच्या माहिती पुस्तिकेचे, शासनाचे मुखपत्र लोकराज्य या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतरत्न डॉ .बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
यावेळी राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे, सगळ्या जगात भारतापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि भारतात त्या मानाने मृत्यू संख्या कमी आहे याचे कारण एकच आहे की, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला, आणि याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल, सर्वजणांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करीत आहे. माझे ही त्यांना विनम्र अभिवादन.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. एक शक्तिमान देश म्हणून भारताची ओळख जगात व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होवू या. त्याचबरोबर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत .
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प करूया! दरवर्षी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनेकांनी, कोरोना संकटामुळे यंदा आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही आभार!,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. मात्र, यंदा खबरदारीची योजना म्हणून कोविड विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आले. या आवाहनाला अनुयायांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे दिसून येत असून चैत्यभूमीवर नागरिक आलेले नसल्याचे पहावयास मिळाले. हा प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले.
भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन रविवार, दिनांक ६ डिसेंबर, २०२० रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिन तयारी बाबतची माहिती देणारी पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते चैत्यभूमी लगतच्या नियंत्रण कक्ष येथे आज (दिनांक ५ डिसेंबर, २०२०) सकाळी करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्रविणा मोरजकर, नगरसेवक अमेय घोले तसेच उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर याप्रसंगी म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधाही पुरवल्या जातात. यंदा मात्र स्थिती वेगळी आहे. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन आणि आपण सर्व सहकार्याने प्रयत्न करत आहोत. कोविडमुळे एकत्र येण्यावर असलेल्या मर्यादा पाहता अनुयायांनी यंदा चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने सातत्याने केले आहे. त्यास अनुयायांनी संपूर्ण प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. कारण दरवर्षी ५ डिसेंबरला देखील अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी रिघ असते. यंदा ती रिघ, अनुयायी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य उद्या ६ डिसेंबर रोजी देखील अपेक्षित आहे, असे आवाहनही महापौरांनी याप्रसंगी पुन्हा एकदा केले. तसेच महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अनुयांयाचे विशेष आभारही महापौरांनी मानले आहेत.
आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, सर्वाधिक शैक्षणिक पदव्या प्राप्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संविधानातून अधिकार, संरक्षण यासोबत सन्मानही मिळवून दिला आहे. संपूर्ण भारत देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून योगदान दिले आहे. दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱया अनुयायांना चांगल्या सेवा-सुविधा पुरवता याव्यात, यासाठी महानगरपालिकेकडून उपलब्ध होत असलेल्या निधीमध्ये सतत वाढ करण्यात येत आहे, ही चांगली बाब आहे. यंदा कोरोनामुळे अनुयायांनी येऊ नये, यासाठी वेळीच करण्यात करण्यात आलेले आवाहन आणि देण्यात आलेल्या सूचना यांचा योग्य परिणाम दिसून येतो आहे. या सुचनांचे पालन अनुयायी करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होत असलेल्या सर्व कार्यवाहीबद्दल आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव यांनी आभारही मानले.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असून, निर्बंधही घातले होते. त्यामुळे वर्षानुवर्षे न चुकता चैत्यभूमीवर जाणाऱ्या हजारो अनुयायींना यावेळी जाता येणार नव्हते.
मात्र, यावर्षी आगळे अभिवादन व मनातील भावना अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचत्या केल्या आहेत. ‘एक पत्र’ त्यांच्या नावे पाठविण्यात येत आहे. देशभरातून जे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत, ते चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येने पत्रे पाठवीत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजीसह इतर भाषांमधून ही पत्रे पाठवली जात आहेत.
पत्र पाठविण्याचा उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. अनेक आंबेडकरी अनुयायी या अभियानात सामील झाले. शंभरवर पोस्ट कार्ड खरेदी करून अनुयायांना दिले गेले. कोरोनामुळे यंदा चैत्यभूमीवर जाता येणार नाही. पोस्ट कार्डच्या माध्यमातून आमच्या भावना पोहोचत्या करीत आहोत. ज्यांना जाता येणार नाही, त्यांनीही पत्र पाठवून या उपक्रमात सामील व्हावे. अनिकेत कुत्तरमारे,समता सैनिक दल यांनी आवाहन केले होते.
मोठ्या प्रमाणावर पोस्टकार्ड पाठवण्याचा ट्रेंड निघाला की निघालाच. कोरोनामुळे ६ डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील समस्त आंबेडकरी जनतेची ऊर्जाभूमी असलेल्या चैत्यभूमी येथे न जाता महामानवास ऑनलाइन घरातूनच अभिवादन करण्याचे आंबेडकरी अनुयायांनी ठरवले. कोरोना महामारीमुळे संसर्ग टाळण्यासाठी सोशल मीडियावर आंबेडकरी अनुयायांनी समस्त आंबेडकरी जनतेला राष्ट्रनिर्मात्यास घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायी ऑनलाइन तसेच संविधानाची प्रतिकृती, कविता, बाबासाहेबांचे विचार पोस्ट कार्डवर लिहून ते चैत्यभूमी येथे पाठवून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दादर येथील ऊर्जाभूमी असलेल्या चैत्यभूमी येथे येतात. अगदी वादळ-वारा, पाऊस, थंडी अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी लहानथोर, आबालवृद्ध, महिला ‘जय भीम’चा घोष करत चैत्यभूमी येथे येतात. मात्र, मागील आठ ते नऊ महिने देशासह जगावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. या रोगावर अद्याप तरी कुठलीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे यावर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायी यावेळी चैत्यभूमीवर कुठल्याही प्रकारची गर्दी न करता महामानवास ऑनलाइन पद्धतीने, पोस्ट कार्ड पाठवून घरातूनच अभिवादन केले.
महाराष्ट्र आणि देशभरातून जे अनुयायी चैत्ययभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत. अशा चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येनं पत्र येत आहेत. या पत्रांपैकी अनेक पत्रं लहान मुलांनी लिहिली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषेतली पत्रं चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवली जात आहेत. उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगु अशा अनेक भाषांमधून ही पत्रं पाठवली जात आहेत.
विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्ययमातून हा उपक्रम राबवला जात आहे. “ज्यांना कोरोना महामारीच्या काळात खेडेगाव, तालुका, जिल्हा आणि इतर राज्यातून चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी विश्वशांती सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. लाखो पत्रे चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी जमा होतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंती, बुद्धजयंती, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साधेपणाने आणि घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच आता राज्यातील लहान मोठ्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी पाहता बाबासाहेबांना घरीच राहून अभिवादन करण्यात यावे, असे प्रशासनाने कळवले आहे. त्याला प्रतिसाद देत जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी बाबासाहेबांप्रति कृतज्ञता आणि अभिवादन व्यक्त करणारी पत्रे लिहून चैत्यभूमी स्मारक, दादर (प)., मुंबई- ४०००२८ या पत्त्यावर पाठवून दिली आहेत.
काय लिहिले आहे पत्रात?
‘प्रिय बाबासाहेब, तुमच्यामुळे आमची कुळी उद्धारली. शिक्षणामुळे आमचे कल्याण झाले. तुमचाच आदर्श घेऊन मी खूप खूप शिकणार. खूप पुस्तके वाचणार. कोरोनामुळे सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी आम्ही येऊ शकत नाही. तरी माझे शब्दरूपी अभिवादन स्वीकारावे, ही विनंती. जयभीम. ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपणास विनम्र अभिवादन!’
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना पत्र लिहिले असून आजच्या दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात…
परमपूज्य बाबासाहेब,
देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.. आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही अविरत कार्य करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!
विविध प्रकारच्या माध्यमातून आज चैत्यभूमीला वंदन करण्यात आले. त्याची दखल महापालिका आणि महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. कोरोना पूर्णतः नष्ट झालेला नाही. त्याचा धोका आहेच. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांचे मन:पुर्वक अभिनंदन!
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
०६.१२.२०