बापाच्या पिंडावर

आता, बापाच्या पिंडावर
पाणी सोडताना
मनात घालतो सारे हिशोब –
बापाने आपल्यासाठी
आटविलेल्या रक्ताचे
वेचलेल्या कष्टांचे
खाल्लेल्या खस्तांचे
आणि
माझ्या दूरदेशातल्या विलायती पडद्यामागून
पाहिलेले चित्र
बापाच्या उद्ध्वस्त स्वप्नांचे…

ठेवले मी सारे पिंडासमोर –
माझ्या अत्युच्च शिक्षणाचे रद्दी दाखले,
माझी पैशात लोळणारी बेगडी सुखे,
पाश्चात्त्य सुखाच्या चैनी परिभाषा,
गावाकडील नूतन बंगल्याचे स्वप्न,
विलायती दारू
श्रीमंत कोरडे अश्रू
वगैरे वगैरे…

केल्या विनवण्या आणा-भाका
कावळ्याने पिंडाला शिवून
बापाला मुक्ती द्यावी म्हणून…

आता वाटतं
कदाचित
शिवलाही असता कावळा पिंडाला
सुखासमाधानाने,
जर मी बापाला
एकटा सोडला नसता तर…!!

■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *