कवी – कृ.ब.निकुंब
कविता – घाल घाल पिंगा वाऱ्या…
कृष्णाजी बळवंत निकुंब.(कृ.ब.निकुंब).
जन्म – २२/११/१९१९
मृत्यू – ३०/०६/१९९९
कृ.ब.निकुंब हे हळुवार मनाचे भावकवी म्हणून सर्वपरिचीत होते. त्याचप्रमाणे ते हाडाचे शिक्षक होते. साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय हे विषय ते मोठ्या आवडीने शिकवत असत. वर्गात शिकवत ते अनेक तोंडपाठ कविता सादर करीत असत.
वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यानी कविता लेखन सुरू केले. त्यांचे वाचन आणि निरिक्षण अतिशय सुक्ष्म होते. त्यांच्या कवितेत काळाचे प्रतिबिंब उमटत असे.
त्यांनी सामाजीक, राजकीय, निसर्ग या विषयांवर कविता लिहिल्या, तरी आत्मशोध हा त्यांच्या कवितेचा गाभा होता.
त्यांच्या कवितेची कक्षा व्यापक होती. त्या काळातील भोवतालच्या गोष्टींची जाणीव त्याच्या कवितेत वाचकांना होते. कृ.ब.निकुंब यांनी बालकविताही लिहिल्या. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सुक्ष्मता आणि निश्चितता, शैलिचे लालित्य आणि संयम या विशेषता त्यांच्या लिखाणात दिसून येतात.
कवी कृ.ब.निकुंब यांच्या कविता मोजक्याच पण आशय संपन्न आणि मनाला हात घालणाऱ्या आहेत. मृगावर्त, पंखपल्लवी, उर्मिला, उज्ज्वला, अनुबंध, हे त्यांचे महत्वाचे लेखन आहे.
“मृगवर्त” या नाविन्यपूर्ण खंडकाव्याची निर्मिती त्यांनी केली.
“फणसाचे पान” हा त्यांचा समिक्षाग्रंथ प्रकाशित आहे.
“घाल घाल पिंगा वारा माझ्या परसातं…” ही त्यांची प्रसिद्ध कविता त्यांच्या रसाळ काव्य आशयामुळे वाचकांच्या थेट काळजाला हात घालते. भावविभोर झालेल्या सासूरवाशीणीचे मनोरथ प्रगट करणारी ही रचना वाचताना आपण ते भाव प्रत्यक्ष अनुभवत आहोत असा भास होतो.
या कवितेचं एक वैशिष्ट्य म्हणजे दोन वेगवेगळ्या संगीतकारांकडून वेगवेगळ्या चालीत हे गीत ध्वनिमुद्रीत झालं.
या कवितेला कमलाकर भागवत यांनी भाव करूण चाल दिली आहे तर सुमन कल्याणपूर यांचा आर्त स्वरातील आवाज यामुळे ही कविता एक अजरामर गीत बनले. हे गीत चाल घरघरात रसिकमनावर आजही राज्य करते.
तर यापुर्वी २०वर्षे अगोदर याच कवितेला गीतकार ए.पी.नारायणगावकर यांनीही संगीबद्ध केलं होतं, आणि आवाज दिला होता श्रीमती कालिंदी केसरकर यांनी.
अशा प्रकारे एकच कविता/गीत दोन वेगवेगळ्या चालीत, दोन वेगळे वाद्यवृंद आणि गायनशैलीही भिन्न असलेले असे हे वैशिष्ट्यपूर्ण गीत विरळाच म्हणावं लागेल.
चला तर मग प्रत्यक्ष या कवितेचा आस्वाद घेऊयात…
घाल घाल पिंगा वाऱ्या
घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !
“सुखी आहे पोर” सांग आईच्या कानात
“आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !
विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.
फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुलीया करी कशी ग, बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय … !”
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !
— कृ.ब. निकुंब
◆◆◆◆◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/