फुलवळ (धोंडीबा बोरगावे)
कंधार तालुक्यातील फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग जात असल्याने गावावरून दोन महामार्ग जतायेय याचा जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षाही तोच रस्ता रखडल्यामुळे होत असलेल्या अडचणीमुळे त्रासदायक ठरत असून दोन गुत्तेदारांच्या वादात अडगळीत पडलेला महामार्ग जनुकांही अपघातांनाच आमंत्रण देतोय की काय अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यासह प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथून लोहा ते फुलवळ मार्गे मुखेड हा राज्य महामार्ग जात आहे तर नांदेड ते फुलवळ मार्गे जांब हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. सदरील दोन्ही महामार्ग रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार हे वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा सिमेंट रस्ता आहे तर राज्य महामार्ग हा डांबरीकरण रस्ता होत आहे.
सदर दोन्ही रस्ते हे फुलवळ बसस्टँड ते दत्तगड एवढ्या अंतरावर एकत्रित येत असल्याने फुलवळवासीयांना या दोन्ही रस्त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. याच आशेपोटी सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सध्या आपापली दुकाने थाटण्याची जनुकांही स्पर्धाच लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एवढेच नाही तर येथील एम आय डी सी ला सुद्धा लवकरच चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदरील रस्त्याचे काम हे ठिकठिकाणी अर्धवटच असून कुठे पुलाचे काम अर्धवट आहे तर कुठे रस्त्याचे काम अर्धवट असल्याने जागोजागी खड्डे , खाच खळगे पडले आहेत. त्यामुळे वाहनांची वाट लागत असून वाहनधारक व प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री बे रात्री तर या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
विशेष बाब म्हणजे फुलवळ बसस्टँड शेजारी मुखेड व जांब या दोन्ही रस्त्याला जोडणाऱ्या चौकाच्या ठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघातस्थिती निर्माण झाली आहे. हे मुख्य ठिकाण म्हणजे नेमके कोणत्या रस्त्याच्या गुत्तेदाराकडे येतो हा प्रश्नच निकाली निघाला नसल्यामुळे सदर दोन गुत्तेदारांच्या वादात या रस्त्याचे आजपर्यंत काम रखडल्यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना कसोटीला तोंड द्यावं लागतं आहे तर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे , त्यामुळे येथे छोटेमोठे अपघात तर नेहमीच होत आहेत परंतु जीवघेणी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कधी काय होईल आणि किती जीव गमवावे लागतील हे आज सांगणे कठीण असले तरी परिस्थिती अवघड होतं आहे त्यामुळे संबंधित अधिकारी व गुत्तेदार हे याकडे गंभीरपणे कधी पाहतील असा प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहे.
रस्त्याचे व पुलाचे अर्धवट काम करून संबंधित गुत्तेदार नेमके कुठे गायब झाले की काय ? आणि सदर रस्त्यावर काम पाहणारे संबंधित अधिकारी काय झोपा काढताहेत की काय ? अशी प्रश्नांकित परिस्थिती निर्माण झाली असून केवळ आमच्या शेती व जागा काबीज करून घेण्यापूरतेच त्यांची काम होती की काय ? असाही सवाल विचारत येथे निर्माण झालेल्या अपघातग्रस्त परिस्थिती ला नेमकं जबाबदार कोण ? असाही सवाल पुढे येत आहे , तेंव्हा शासन , प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुत्तेदारांना वेळीच काम पूर्ण करण्यासाठी भाग पाडले तरच होणारे अनर्थ टाळता येऊ शकतील अन्यथा उदभवणाऱ्या परिस्थिती जबाबदार कोण ? असा संताप व्यक्त केला जात आहे.