लोहा / प्रतिनिधी
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल या इंधनाचे दर मागे घ्यावे व तमाम शेतकर्याबद्दल काढलेले अपशब्द केंद्र राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मागें घेऊन शेतकऱ्यांची माफी मागावी या प्रमुख मागणीसाठी लोह्यात लोहा – कंधार चे शिवसेनेचे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी पं. स. सदस्य नवनाथ चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील ढाले, शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार, लोहा तालुका संघटक स्वप्नील पाटील गारोळे, किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, , संचालक भीमराव शिंदे, साहेबराव हरगावकर, अमर शेख, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने तुडवण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे लोहा – कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे म्हणाले की,
केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून शेतकरी कष्टकरी कामगार यांच्याविरोधात कायदे करून मुठभर उद्योगपतीच्या हातात देशाचे अर्थकारण देण्याचे काम त्यांनी चालवले आहे. मोदी सरकारने तात्काळ कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे. दिल्ली येथील संयुक्त शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नुकताच बंद पाळण्यात आला या बंदला महाराष्ट्र मध्ये भाजपा वगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस तसेच सर्व संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाल्यामुळे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासहित भाजपाला चे पोट दुखत आहे महाराष्ट्रातील सता गेल्यामुळे राज्यातील शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या डोळ्यात सलत आहे त्यामुळे डोके ठिकाणावर न ठेवता माथेफिरू सारखे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शेतकऱ्याच्या विरोधात विधान करीत आहेत त्यानी शेतकऱ्यांची तात्काळ माफी मागावी असे बाळासाहेब पाटील कराळे म्हणाले.
भाजपच्या नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा ही समाचार घेतला शेतकरी आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा असताना नांदेड मध्ये खासदार शेतकऱ्यांच्या विरोधात वागत आहेत. केद्रात भाजपाचे सरकार आहे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली नांदेड- लातूर ३६१ हा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत आणि अपघात होत आहेत या रस्त्याचे काम अद्याप पर्यंत सुरू झालेले नाही खा. चिखलीकर याप्रकरणी मूग गिळून का गप्प आहेत त्यांनी का डोळ्यावर पट्टी बांधली आहे का त्यांच्या डोळ्याला रस्ता दिसत नाही का पाणी कुठे मुरले हे जनतेला कळले पाहिजे तसेच खासदार चिखलीकर यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची भेट घेतली याबद्दल वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत तेव्हा खासदार चिखलीकर यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याला पेट्रोल -डिझेल चे भाव कमी करायला लावावे की जास्त करायला सांगितले आहे असा प्रश्न शिवसेनेला पडला आहे असा टोलाही बाळासाहेब पाटील कराळे यांनी लगावला आहे.