मतदार राजा जागा हो..

‘मतदार राजा जागा हो..विकासाचा धागा हो’. असे वारंवार सांगण्याची वेळ आली आहे. सध्या गावातील चावड्यावर ग्रामपंचायत निवडणूकीच्या चर्चा होत आहेत. उमेदवार कोण असेल? कोणते पॅनल बाजी मारेल? कोणाचा गुलाल उधळेल यावर चर्चा चालू आहेत. त्या चर्चा होतच राहतील.पण आज आपल्याला मताचं दान देऊन प्रतिनिधी निवडणाऱ्या मतदार राजा विषयी बोलायचे आहे.

आपण नेहमीच उमेदवार, सदस्य, प्रतिनिधी यांना नावे ठेवत असतो.पण त्यांना आपणच निवडून दिलेले असते.तेंव्हाच ते प्रतिनिधी म्हणून तिथे कार्यरत असतात. म्हणून त्यांच्या भल्या बुऱ्या कामात, निर्णयात अप्रत्यक्षपणे आपला पण (मतदार राजाचा) हात असतोच.त्यामुळे आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. उमेदवार ,प्रतिनिधी पेक्षा मतदान करणाऱ्यांची जबाबदारी जास्त असते.

उच्च शिक्षीत, तरुण, अभ्यासू,समाजकार्याची आवड असणारा,समाजमन जाणणारा, निर्णयक्षम,जबाबदार, जुन्यातून चांगले अनुभव असणारा उमेदवार निवडण्याची जबाबदारी मतदार राजाची असते.तेंव्हा सगळी मेख मतदार राजाजवळच असते. त्यामुळे तो उमेदवार निवडताना वरील बाबींचा विचार करतो की नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

उमेदवाराकडून दारू, मटण,पार्ट्या, सहलवाऱ्या घेऊन ,उमेदवाराचे नाते,जात,धर्म पाहून, त्याच्या सोबतचे संबंध जाणून जर आपण मतदान करु लागलो तर योग्य उमेदवार कसा निवडला जाईल आणि त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करायची?चाऱ्याण्याची कोंबडी खाऊन पाच वर्ष आपण नुसत्या विकासाच्या गप्पा झोडायच्या आणि तो झालाच नाही म्हणून ओरड करायची आणि प्रतिनिधीच्या,सदस्यांच्या नावे बोटे मोडायचे हे कसे चालणार?

“मतदार राजा जागा हो..आपली जबाबदारी ओळख…..आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाड….समोरचा चुकला तर जाब विचारायला शिक…आणि गावविकासाचा धागा हो.”

सतीश यानभुरे
७०८३१४४८८५
२३/१२/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *