कंधार तालुक्यात महिला बचत गटांचे स्वावलंबन
कंधारः- (डॉ.माधव कुद्रे)
महिला बचत गटांनी दशसूत्रीचा यथायोग्य वापर करत दुष्काळाचा अंधःकार हटविण्याचा संकल्प सोडला आहे. महिला बचत गटांनी स्वावलंबनातून शासकीय योजनांची जाणीव-जागृती करत कुटुंबाचा मोठा आधार होण्यासाठी
कंधार तालुक्यात महिला बचत गटांनी स्वावलंबनाची मशाल हाती घेतली.
तालुक्यात दारिद्रय रेषेखालील महिला बचत गटांची संख्या 380 आहे. कर्जात बुडालेली व्यक्ती आर्थिक दृष्ट्या कमकुवत असली तरी संघर्षाची उर्मी दांडगी असते. त्यावर कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी कोणीतरी दाता असावा लागतो. राज्य शासनाने दारिद्र्य निर्मूलनासाठी 1999 स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू केली. महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना फलद्रूप झाली आहे. सदर योजना 2013 पर्यंत होती. आता महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान व स्वर्णजयंती कार्यक्रम अशा विविध योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरु केल्या आहेत. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी महिलांनी आपल्या कुटुंबाला आधार देण्याची किमया साधली आहे. पंचसूत्री व दशसूत्रीचा वापर करत, आपल्या आवडीनुसार बिब्बा, गोडंबी, हळद, चिवडा, हस्तकला, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, साडी लेस वर्क, रेडीमेड कपडे, मिरची, मसाला, खाद्यपदार्थ आदींचे उत्पादन करून विक्रीवर भर देऊन स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग निवडला आहे. महिला बचत गटांनी नियमित बैठका, नियमित बचत कर्जाची परतफेड, गटाचे लेखे अद्ययावत ठेवणे, नियमित आरोग्याची काळजी घेणे, शिक्षण विषयक जागरुकता वाढविणे, पंचायत राज संस्थांबरोबर नियमित सहभाग, शासकीय योजनांमध्ये नियमित सहभाग, शास्वत उपजिविकेसाठी उपाययोजना या दशसूत्रीचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. दशसूत्रीच्या माध्यमातून विविध महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यात येते.
बचत गटांनी केवळ स्वावलंबनार भर न देता सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी मदत, ग्रामसभेत सक्रिय सहभाग, शासन योजनेत सक्रिय सहभाग, व तसेच आरोग्याच्या दृष्टीने कोरोना काळातही सामाजिक बांधिलकी म्हणून जनजागृती केली आहे. बचत गटातील सदस्यांची 100% गटातील व कुटुंबातील 100% बालके त्यांच्यावर वयोगटातून शिक्षणासाठी व विविध आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी परिस्थिती नसेल तर त्या कुटुंबाला गटातून अर्थसहाय्य व मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे. शौचालयाचा नियमित वापर व कुपोषणमुक्तीवर भर दिला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीने जनता गांगरून गेली आहे. नैरास्य निर्माण होऊन अघटित घटना घडू नये, यासाठी महिलांनी कुटुंबांना आधार देण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये. यासाठी सर्वच महिला बचत गटातील महिला सरसावल्या असून व्यवसाय कर्ज काढून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात दिग्रस बु., नवघरवाडी, बहादरपुरा, बारुळ, शिराढोण, तेलंगवाडी, लाठ खुर्द, कंधारेवाडी, वंजारवाडी, मानसपुरी, उमरज, मजरे धर्मापुरी, फुलवळ आदी गावांतील महिलांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित कर्जफेड करत शासकीय अनुदानाचा लाभ घेतला आहे.