उपक्रम – स्मृतिगंध (क्र.३७) कविता मनामनातल्या*(विजो) विजय जोशी *डोंबिवली ** कवी – विनायक दामोदर सावरकर

कवी – विनायक दामोदर सावरकर
कविता – १) जयोऽस्तु ते
२) ने मजसी ने

विनायक दामोदर सावरकर.


जन्म – २८/०५/१८८३ (भगूर, नाशिक).
मृत्यू – २६/०२/१९६६ (मुंबई).
कवी, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, हिंदूतत्वज्ञ, भाषा व लिपी शुद्धी चळवळीचे प्रणेते.

सावरकरांचे व्यक्तिमत्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबीत झालेले आहे.
कवी, निबंधकार, नाटककार, राजकीय व सामाजिक कादंबरी लेखन, इतिहासकार, भाषा शास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची विविध रूपे आहेत.

सावरकरांनी “१८५७ चा स्वातंत्र्य समर” हा ग्रंथ लिहिला.
सावरकरांनी पहिले काव्य “स्वदेशी फटका” वयाच्या ११व्या वर्षी लिहिले.


सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडन वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरी येथील वास्तव्यात लिहिल्या.
कोठडीच्या भितींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारे सावरकर हे एकमेव कवी होते.


शब्दलालित्य, भावोत्कट, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये होती.
छंदबद्ध, वृत्तबद्ध, ताल-लय सौंदर्य आणि संस्कृतप्रचुरता यामुळे सावरकर यांच्या कवितां ऐकताना कानाला मधुर लागतात.
सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांची लेखनाची बलस्थाने होती.
अंदमानच्या तुरूंगात असताना त्यांनी काही उर्दू गझलाही लिहिल्या. त्या जुलै २०१३ मध्ये सापडल्या. या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत झाल्या आहेत.
सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि मराठीतून हिंदीत भाषांतरीत झालेल्या कविता यांची सीडी निघाली.
सावरकरांनी १०००० पेक्षा जास्त पाने मराठीत, तर १५०० पेक्षा जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली.

सागरा प्राण तळमळला, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोsस्तु ते, तानाजीचा पोवाडा ह्या त्यांच्या काही प्रचंड गाजलेल्या कविता आहेत.
सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे.
अखंड सावध असावे, १८५७ चा स्वातंत्र्य समर, अंदमानच्या अंधेरीतून, काळे पाणी, महाकाव्य कमला, माझी जन्मठेप, मोपल्याचे बंड, सन्यस्त खड्गं आणि बोधीवृक्ष ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत.
कमला, गोमंतक, विरहोच्छवास, सप्तर्षी ही महाकाव्ये सावरकरांनी लिहिली.
स्फुट काव्ये, सावरकरांच्या कविता, चाफेकरांचा फटका अशी काव्य साहित्यकृती त्यांनी केल्या.
साहित्य क्षेत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.
सावरकर यांची अनेक ठिकाणी स्मारके उभारलेली आहेत.

साहित्यिक कार्यासोबतच सावरकरांनी समाजातील जातीव्यवस्था आणि विषमता याविरोधात कार्य केले.
अंधश्रद्धा, जातीभेद याविरोधात त्यांनी लिखाण केले. अस्पृश्यांसाठी मंदिरे खुली केली. आंतरजातीय विवाह, पतितपावन मंदीर, सामाईक भोजनालये याबद्दलही त्यांचे कार्य मोलाचे आहे.

अशा प्रतिभावंत चतुरस्त्र बुद्धिवान सावरकरांनी साहित्य क्षेत्रासाठीचे योगदान खूप मोलाचे आहे.

सावरकर यांच्या “जयोsस्तु ते” आणि ‘ने मजसी ने” या आपल्या सर्व भारतीयांच्या मनात देशाभिमान जागृत करणाऱ्या अजरामर कविता आहेत. जयोsस्तु ते मध्ये देशप्रेम, देशभक्ती प्रस्तुत करतानाच सावरकरांनी स्वातंत्र्य देवतेची प्रार्थना केलेली आहे, स्तुती केलेली आहे. आणि मंगेशकर घराण्याने या कवितेला सुंदर गीताचा साज चढवून ठेवला आहे.

इंग्लंडला असताना एकदा सावरकर दक्षिणेकडील ब्रायटन या शहराच्या समुद्र किनारी फेरफटका मारायला गेले होते.
मातृभूमीची पराकोटीची ओढ त्यांच्या मनात होती. मातृभूमीच्या आठवणीच्या वेदना त्यांना असह्य करीत होत्या. याच वेदना शब्दरुपाने त्यांच्या काव्यात परावर्तीत झाल्या आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली एक अजरामर कविता जन्माला आली – “ने मजसी ने परत मातृभूमीला”.
सावरकर सागराला आपल्या कवितेतून विनवणी करतात, ‘सागरा मला माझ्या मातृभुमीला परत घेऊन चल, माझ्या मातृभुमीच्या भेटीसाठी माझा जीव तळमळतो आहे…..’
चला तर मित्रांनो, आपण यो दोन्ही कवितांचा आनंद घेऊयात…

जयोsस्तु ते

जयोsस्तु ते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥

  • विनायक दामोदर सावरकर

  • ◆◆◆

ने मजसी ने

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला


-विनायक दामोदर सावरकर
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट

विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)

सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.

Vijay Joshi sir


विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *