नांदेड ; प्रतिनिधी
प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या सुधाकर पत्र भूषण पुरस्कारासाठी वर्ष 2020 चे मानकरी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा संयोजक धर्मभूषण ॲड दिलीप ठाकूर यांनी केली आहे.
कै. सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरुप रोख रूपये 5000, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि राज्यवस्त्र असे आहे. यापूर्वी प्राचार्य देवदत्त तुंगार, गोवर्धन बियाणी, विजय जोशी यांना सुधाकर पत्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर झालेले 2018 चे मानकरी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे आणि वर्ष 2019 साठी आवृत्ती संपादक अनिल कसबे कसबे यांना नरेंद्र महोत्सव कार्यक्रम कोरोना संक्रमणामुळे
न झाल्याने देण्यात आला नव्हता. सुनील जोशी यांच्या समवेत पंढरीनाथ बोकारे व अनिल कसबे यांना देखील लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
(सुनील जोशी यांचा अल्प परिचय)
‘ लोकमत ‘ दैनिकात मागील २६ वर्षांपासून सुनील जोशी कार्यरत आहेत. सुरुवातीला नांदेड येथे क्रीडा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम सुरू केले होते, त्यानंतर क्राईम, कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आदी बीटची जबाबदारी त्यांनी सांभाळली. या दरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याची संस्थेने दखल घेऊन त्यांना १९९६ मध्ये जालना जिल्हा प्रतिनिधीची जबाबदारी सोपवली होती, उत्कृष्ठ कामाचा आलेख वाढत जाऊन संस्थेने त्यांच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या सोपवल्याय. हिंगोली, परभणी, नांदेड येथे जिल्हा प्रतिनिधी तसेच औरंगाबाद येथे प्रादेशिक विभाग, ब्युरो, औरंगाबाद ग्रामीण तसेच मुंबई आदी ठिकाणीही त्यांनी काम पाहिले आहे. या दरम्यान जोशी यांनी एकापेक्षा एक घोटाळ्याच्या बातम्या शोधून त्या तडीस नेल्या. नांदेड येथे जिल्हाप्रतिनिधी असताना जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘सादील अनुदानाचा’ घोटाळा बाहेर काढला होता, तो प्रचंड गाजला. यात तत्कालीन सीओ, यांची बदली झाली. शिक्षण अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते. याशिवाय १० ते १२ केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, अर्थ खात्यातील अधिकारी, कर्मचारी आदीवरही कारवाई झाली होती. परभणी येथे असताना पूर्णा पालिकेतील घोटाळा लोकमतमध्ये लावून धरून तडीस नेला होता.
पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना अनेक राजकीय पुढारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला, या सर्वांचा उपयोग त्यांनी बातम्यांसाठी करून घेतला. सुनील जोशी हे सध्या नांदेड येथेच लोकमतमध्ये कार्यरत आहेत, त्यांच्याकडे ग्रामीणची जबाबदारी आहे.
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्रबाबू, कार्यकारी संचालक करणबाबू यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकरसर, मराठवाडा संपादक सुधीर महाजन सर, अतुल कुलकर्णी (मुंबई), कमलाकर जोशी आदींना ते आदर्श मानतात. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार असून, पत्नी वैशाली ह्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वरिष्ठ लिपिका म्हणून कार्यरत आहेत. पुण्यातील अग्रगण्य व्हीआयटी, बिबेवाडी अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलगा धनंजय हा बीटेक तृतीय वर्षाला असून मुलगी रेणुका अकरावीला आहे.