नांदेड, दिनांक १८ जानेवारी २०२१:
भोकर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि काँग्रेसशी निगडित पॅनलला मिळालेला घवघवित विजय हा काँग्रेसच्या सर्वसमावेशक व विकासात्मक धोरणांचा विजय असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भोकर विधानसभेतील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदार काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले आहेत. तीच परंपरा कायम ठेवून या मतदारसंघाने तीनही तालुके मिळून १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित पॅनल निवडून दिले आहेत. मतदारांनी काँग्रेसवर दर्शवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी असून, हे निकाल पुढील काळात अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी बळ देणारे ठरतील, असेही ना. चव्हाण म्हणाले.