मुदखेड येथे रेल्वे कर्मचारी संघटना कार्यालयाचे उद्घाटन ; विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्रसिंह यांची उपस्थिती
नांदेड – भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या लोकशाही मूल्यांबरोबरच सन्मानाचे जगणे बहाल केले आहे. कोणत्याही माणसाला आचार, विचार आणि विहाराचे स्वातंत्र्य आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समानतेचा, कोणत्याही मनुष्याला आपली संस्कृती जपण्याचा आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. परंतु नोकरशाहीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा छळवाद वाढला आहे. सामान्य कर्मचारी यात भरडले जात आहेत. त्यांना आपल्या अन्यायाबाबत दादही मागता येत नाही. हा छळवाद संघटनांनी संपुष्टात आणला पाहिजे असे प्रतिपादन येथील धम्म चळवळीचे प्रचारक तथा प्रसारक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी मुदखेड येथे एका कार्यक्रमात केले.
यावेळी नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंह, अतिरिक्त डीआरएमचे नागभूषण राव, बांधकाम विभागाचे शिवराम पी. रवी कुमार, विभागीय अध्यक्ष ए. अंफरीम, पी. पेरुमल, ए. राजशेखर, माजी नगराध्यक्ष देविदास चौदंते, नगरसेवक अॅड. कमलेश चौदंते, भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते अश्वजीत, धम्मसंदेश व धम्मदान यात्रा संकल्पक गंगाधर ढवळे, माजी श्रामणेर निवृत्ती लोणे, कपिल नरवाडे, गजभारे काका आदींची उपस्थिती होती.
मुदखेड येथे रेल्वे स्थानकातील आॅल इंडिया एससी व एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. ही इमारत रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक चार जवळ बांधण्यात आली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपेंद्र सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पुर्वी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलतांना सिंह म्हणाले की, कोरोनामुळे संपुर्ण देशभरात रेल्वे ठप्प झाली असून नांदेड डिव्हिजन अंतर्गतही येणाऱ्या सर्व गाड्या बंद आहेत. भविष्यात लवकरच रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार या मार्गावर रेल्वे गाड्या सुरू होतील.
गेल्या काही महिन्यांपासून मुदखेड रेल्वे स्थानकांत रेल्वे विभागात कार्यरत एससी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी नांदेड रेल्वे विभागातील या कर्मचाऱ्यांच्या संघटनेची कार्यालये स्थापन करावी अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात काढलेल्या आदेशात युनियनचे अध्यक्ष विलास मुंघे, संघटनेचे विभागीय सचिव, रेल्वे विभागातल्या शहरातील ट्रॅकमॅनसह इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या माध्यमासाठी या कार्यालयाचा वापर करण्यात येईल, असे उपेंद्र सिंह यांनी सांगितले.
उपस्थित बौद्ध उपासकांकडून भंतेजींना याचना केल्यानंतर पंय्याबोधी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशिल दिले. इमारतीच्या अनावरणानंतर कार्यालयाच्या मोकळ्या जागेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भिक्कू संघाच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. तसेच विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर त्यांना रेल्वे विभागातील प्रतिष्ठित मान्यवर अधिकाऱ्यांची नावे झाडांना देण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. शेवटच्या सत्रात भिक्खु संघाला चिवरदान, भोजनदान व धम्मदान हा कार्यक्रम घेण्यात आला. बालाजी थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी व रेल्वेतील अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.