फुलवळ शिवारात सडलेल्या अवस्थेत पुरुष जातीचे प्रेत आढळले ;ओळख पटविण्यासाठी रात्रभर पोलिसांचे जागरण ….! अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली

कंधारः- (विश्वांभर बसवंते)

तालुक्यातील फुलवळ शिवारातील दत्त टेकडी परिसरात माधव बालाजी गलपवाड यांचे शेतात शनिवार दि.२३ जानेवारी २०२१ रोजी एका ३७ वर्षे अनोळखी पुरुष जातीचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून ‘आत्महत्या की खून ?’ या चर्चेला उधाण आल्याचे ऐकावयास मिळत होते.

अनोळखी पुरुष जातीचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आल्याची चर्चा ऐकताच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर बसवंते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देताच क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक संग्राम जाधव व तुगावे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोलीस वाहनाने घटनास्थळ गाठून जलद गतीने तपासाची चक्रे फिरवली व कसून तपास करण्यास सुरुवात केली.

सदरचे प्रेत हे पूर्णपणे सडलेले असून वन्य प्राण्यांनी प्रेताचे लचके तोडल्यामुळे त्या प्रेताचा केवळ हाडाचा सापळा दिसत असल्यामुळे ओळख पटविणे हे खूप जिकरीचे झाले होते. परंतु सदर प्रेताची ओळख पटविणे आवश्यक होते. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर शेकोटी पेटवून प्रेताची राखण करत मानवताधर्म पाळल्यामुळे पोलिस प्रशासनाचे ग्रामस्थांमधून कौतुक केल्याचे ऐकावयास मिळत आहे.

अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली…!

सदरचा मयत व्यक्ती नामे कैलास भानूदास टोम्पे वय ३७ वर्ष, धंदा मजुरी, राहणारा हालगरा ता.निलंगा जि.लातूर येथील रहिवासी असून दि.१५ जानेवारी २०२१ रोजी मजुरी मिळविण्यासाठी ओळखीच्या मित्रासोबत शारदा कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये दाखल झाला होता. दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी शनिवारी सकाळी शारदा कंस्ट्रक्शन कंपनीचे रोड बांधकाम फुलवळ – दत्त टेकडी मार्गे शेकापुर या साईटवर हजर झाला. सोबतच्या कामगार मित्रांना मी नाश्ता करून येतो असे सांगून निघून गेला, तो परत दिवसभर कामावर आला नसल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली असता, कोठेही पत्ता लागला नसल्यामुळे दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी कंधार पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरील तक्रारीत केलेल्या व्यक्तीचे वर्णन व मयताचे अंगावरील कपड्यांचे वर्णन हे मिळतेजुळते असल्याने सदरील मयताच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता मयत व्यक्ती कैलास भानुदास टोम्पे हा आमच्याच कुटुंबातील व्यक्ती असल्याचे सिद्ध केले. सदरील मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन भाऊ व वृद्ध आई असल्याचे कळले.

फुलवळचे पोलिस पाटील ईरबा देवकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यू ४/२०२१ अन्वये नोंद करुन पुढील तपास पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.मधुकर गोन्टे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *