फुलवळ च्या ग्राम पंचायत वर महिला राज;सरपंच पदी विमलबाई मंगनाळे यांची बिनविरोध निवड तर उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान प्रक्रियेतून तुळशीदास रासवंते यांची निवड.

फुलवळ बातमीदार (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ ग्राम पंचायत च्या सरपंच व उपसरपंच पदासाठी आज ता. ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली , त्यात विमलबाई नागनाथराव मंगनाळे ऊर्फ मुकदम यांची सरपंच पदासाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंच पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान घेतल्यानंतर तुळशीदास रामजी रासवंते यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे निवडणूक अध्याशी यांनी जाहीर केले.

अकरा सदस्यीय ग्राम पंचायत असलेल्या फुलवळ येथे नवनिर्वाचित अकरा ग्राम पंचायत सदस्यातून सरपंच व उपसरपंच यांची निवड प्रक्रिया आज सकाळ पासून सुरुवात झाली , या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून कंधार पं. स.चे विस्तार अधिकारी टी. टी. गुट्टे हे होते तर सचिव म्हणून येथीलच ग्रामविकास अधिकारी टी. जी. पोटेवार आणि सहाय्यक म्हणून सज्जाचे तलाठी गणेश गटकळ तसेच पो.उप निरीक्षक गंगलवाड , पो.हे.कॉ. टाकरस पो.हे .कॉ. एस.आर.शेख यांची उपस्थिती होती.

विद्यमान सरपंच विमलबाई मंगनाळे यांनी यापूर्वी ही २०१० ते २०१३ या कालावधीत फुलवळ ग्राम पंचायत च्या सरपंच पदाचा कारभार यशस्वीपणे सांभाळला होता त्यामुळे यापुढेही त्या आपला कार्यकाळ यशस्वी पार पाडतील यात शंकाच नाही असे समर्थकातून बोलले जात होते.

यावेळी ग्राम पंचायत च्या वतीने ग्राम विकास अधिकारी तुकाराम पोटेवार यांनी नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा शाल , पुष्पहार देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *