पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश ; नांदेड जिल्हयाला तब्बल 566 कोटींचा अतिवृष्टी निधी मंजूर


नांदेड दि.11 (प्रतिनिधी)-

 या वर्षीच्या पावसाळयात जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्हयात वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकर्‍यांना सरकारी मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. जिल्हयातील जास्तीत जास्त बाधित शेतकर्‍यांना ही अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून पहिल्या व दुसरा टप्पा मिळून  जिल्हयातील शेतकर्‍यांसाठी तब्बल 566 कोटींची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.


या वर्षी नांदेड जिल्हयात विक्रमी पाऊस पडला.  जिल्हयाच्या विविध भागात वारंवार झालेली अतिवृष्टी व त्यातून अनेक छोटया-मोठया नद्या व नाल्यांना आलेला पूर यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक गावांमध्ये घरपडी झाली.जनावरांचे गोठे वाहून गेले. अनेक जनावरे दगावली. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत होती.


शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शासनानी दोन हेक्टरच्या मर्यादित जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी  प्रती हेक्टरी 25 हजार मदतीची घोषणा केली होती. नांदेड जिल्हयातील शेतकर्‍यांना जास्तीतजास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण प्रयत्नशील होते. महसूल स्तरावर वारंवार सर्व्हे करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनास त्यांनी केल्या होत्या.


या सर्व बाबींचा परिणाम म्हणून 9 नोव्हेंबर 2020 रोजी निघालेल्या शासनाआदेशानुसार  पहिल्या टप्प्यात जिल्हयातील शेतकर्‍यांना 284 कोटी  तर 7 जानेवारी 2021 रोजी निघालेल्या नव्या आदेशानुसार दुसर्‍या टप्प्यात 282 कोटी असे एकूण 566 कोटी रक्कम मदत निधी म्हणून प्राप्त झाली आहे. या निधी वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत सुरु झाली असून लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे.


पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे एवढया मोठया प्रमाणात शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळणार असून राज्यात नांदेड जिल्हयाला सर्वाधिक मदत निधी मंजूर झाला आहे. याचे सर्व श्रेय पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना असून त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *