साडेचौदा कोटींच्या बी.एड. कॉलेज इमारतीस मान्यता …!पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश


नांदेड – प्रतिनिधी


नांदेड येथील 1968 पासून कार्यान्वीत असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे हे महाविद्यालय अनेक ठिकाणी स्थलांतरीत होत होते. या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केला. त्याचेच फलीत म्हणून नांदेडमध्ये सुमारे 14.50 कोटींची बी.एड.कॉलेजची भव्य वास्तू साकारली जाणार आहे.


देशाची पिढी घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो आणि शिक्षक घडविण्यात अध्यापक महाविद्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. नांदेडमधील जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे भाडेतत्त्वावर जागा किरायाने घेऊन हे महाविद्यालये कसेबसे सुरु होते. महाविद्यालयाचा दर्जा ठरविणार्‍या युजीसीची नॅक कमिटी व नॅशनल कॉन्सील फॉर टीचर एज्युकेशन (एनपीसीई) या संस्थेने सुद्धा महाविद्यालयास स्वतःची इमारत असावी, असे सूचित केले होते.


या संदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून शासकीय अध्यापक महाविद्यालयास स्वतंत्र इमारत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या इमारतीसाठी जागेची आवश्यकता होती. अशा वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात जागा उपलब्ध करून घेतली.  या जागेवर आता 14.41 कोटी रुपयांची भव्य वास्तू उभारली जाणार आहे.


या इमारतीमध्ये अध्यापनासाठीच्या सुसज्य खोल्या, कार्यालय, ग्रंथालय, पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, सौरउर्जा प्रकल्प यासह सर्व सोयी राहणार आहेत. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे ईबीसी वसतिगृहानंतर केवळ आठ दिवसात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या नवीन वास्तूस शासनाने मान्यता दिली आहे. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *