नांदेड ; प्रतिनिधी
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव कोव्हिड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नाइलाजाने रद्द करण्यात आला आहे.परंतु रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून ‘संगीत शंकर दरबार’ या फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवरुन मागील सोळा वर्षांतील निवडक स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.
आज २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता बृजेश्वर मुखर्जी ,अंकिता जोशी व कृष्ण बोनगाणे यांचा जसरंगी,निलाद्री कुमार,
पं.रघुनंदन पणशीकर ,डॉ.अश्विनी भिडे ,पंडित डॉ. एन राजम,पं एम वेंकटेशकुमार ,पं.हरिप्रसाद चौरसिया ,उस्ताद रशिद खाँ,गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या कार्यक्रमाचा रसिकांना लाभ घेता येईल.
(दिनांक २७ फेब्रुवारी २०२१) -मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रम कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेच्या गौरवासाठी तसेच कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.याचा समावेश शंकर दरबारच्या पहाटेच्या कार्यक्रमात केला आहे.त्या निमित्त आतापर्यंत घेतलेल्या कार्यक्रमाचा उजाळा मध्ये सकाळी सहा वाजता पं.हेमंत पेंडसे,सौ.सारिका आपस्तंब -पांडे , संजय जोशी,सुरमणी धनंजय जोशी ,मुग्धा भट, डॉ. मृदुला दाढे -जोशी,नीलाक्षी पेंढारकर, अजित परब,निलेश निरगुडकर यांच्या कार्यक्रमाचा पहाटेच्या सत्रात सादर होईल.
या दोन्ही सत्रातील आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण,उपाध्यक्षा सौ.अमिताताई चव्हाण, सचिव श्री डी.पी. सावंत,सहसचिव श्री उदय निंबाळकर,कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर तथा संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि संयोजन समितीतील संजय जोशी,रत्नाकर अपस्तंभ, अपर्णा नेरलकर, ऋषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख,विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे छायाचित्रकार श्री विजय होकर्णे व बंधु यांनी केलेले चित्रीकरणाचे संकलन व मिश्रण स्वरेश देशपांडे व प्रमोद देशपांडे यांनी केले आहे.