संपादकीय
भय पुतळ्याचे संपता संपेना…..
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायांत प्रचंड संताप निर्माण झाला होता. हे प्रकरण थंडावते न थंडावते तोच कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटविल्याची घटना घडली. या प्रकरणाने तमाम शिवप्रेमींत असंतोष पसरला आहे. पुतळेही जातीनिहाय वाटून घेतले आहेत, ही बाब अलहिदा. परंतु कर्नाटक सरकारला शिवाजी महाराजांचे का वावडे आहे हा सवाल शिवप्रेमी विचारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे. मराठी स्वराज्याचे ते जनक आहेत. ज्या मराठ्यांनी मराठी माणसाचे झेंडे अटकेपार नेऊन लावले होते. हा इतिहास कर्नाटक सरकार विसरत असेल तर सडेतोड जवाब द्यावा लागेल अशी इच्छा तमाम मराठी जनतेची आहे.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. शुक्रवारी ७ आॅगस्टच्या रात्री अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नाडीगांच्या दबावामुळे हे कृत्य केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारची नेहमीच वक्रदृष्टी राहिली आहे. अनेक वेळा भाषावाद, प्रांतवाद या कारणावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचे वाकडे आलेले आहे. निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते आणि त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर तेथील शिवविरोधकांच्या दबावाला प्रशासन बळी पडून मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून आणि महाराष्ट्रातही कानड्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.आज कर्नाटकात सरकारविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यात मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेत छ. शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आला होता. यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी याचा निषेध नोंदवला होता. यावर महाराजांचा पुतळा ज्या जागेवरून हलवण्यात आला होता त्याच जागेवर महाराजांचं स्मारक उभारून विधीवत स्थापना होणार असून स्थापनेवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हजर राहणार असल्याचं काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सांगितलं होतं. अतिक्रमणाची कारवाई करताना अधिकाऱ्यांनी महापुरूषाच्या सन्मानाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशा प्रकरणांमुळे जनभावनेचा क्षोभ होतो आणि याचे गंभीर पडसाद उमटतात. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे आदर्श म्हणून ज्या महान व्यक्तिमत्त्वाला पूजले जाते त्यांचा अवमान झाला तर महाराष्ट्र कदापि सहन केला जात नाही, त्यामुळे या बाबतीत टाकणात येणारी पावले फारच काळजीपूर्वक टाकावी लागतात. ज्यांचा त्यांच्या आयुष्यात छळवाद मांडला गेला, ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक खडतर प्रसंगांचा सामना करुन आपल्याला वैभव मिळवून दिले, त्यांचा त्यांच्या मरणोपरांत छळच का होतो आहे हा एक गंभीर पण अनाकलनीय प्रश्न आहे. पुतळ्याचे भय अजूनही कुण्याच्या मनात आहे,? या महापुरुषांच्या पुतळामय अस्तित्वाचा तिरस्कार कशासाठी वाटतो ? हे भय इथले का संपत नाही?आपण आपल्या महापुरुषांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला माणसा माणसांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवायला कमी पडलो आहोत. समाजकारण आणि राजकारण यात आपण थोडाही फरक करीत नाही. गैरसमजातून महापुरुषांबद्दलच्या चुकीच्या संकल्पना लोकांत घर करुन राहिलेल्या आहेत. त्यांच्यात एक भय दबा धरून बसलेले आहे. याचे कारण काही कळेना आणि भय पुतळ्यांचे संपता संपेना….
गंगाधर ढवळे ,नांदेड