नांदेड – जिल्ह्यातील सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही परिस्थितीत वा कोणत्याही कारणास्तव गर्दी करण्यात येऊ नये. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या रोगामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र येण्याचे वा कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. इतर धार्मिक स्थळांबरोबरच बुद्ध विहारातही गर्दी टाळून बौद्ध उपासक उपासिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले.
ते तालुक्यातील खुरगाव येथे श्रामणेर दीक्षा सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी भदंत सत्यशिल महाथेरो, भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न, भंते चंद्रमुनी, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सदानंद, भंते सुनंद, भंते सुमेध, भंते सुभद्र, भंते संघमित्र, भंते शिलभद्र, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे यांची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे अठरा उपासकांना श्रामणेर दीक्षा देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीप्रशासनाचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मास्क, सॅनिटाईझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा. नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य केले पाहिजे असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, महापौर मोहिनी येवनकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंची बैठक घेतली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोणत्याही बुद्ध विहारात कोणत्याही कारणास्तव गर्दी करु नये असे आवाहन पंय्याबोधी यांनी केले होते.
फाल्गून पौर्णिमेनिमित्त अठरा उपासकांना त्यांच्या संमतीपत्रानुसार विधीवत श्रामणेर दीक्षा देण्यात आली. त्यात अमोल मस्के, सतिश मोगले, निलेश गायकवाड, आदित्य गायकवाड, अनोज गायकवाड, अभिराज हटकर, निहाल लव्हाळे, प्रतिक सोनकांबळे, किरण जाधव, श्रीशांत जाधव, अविनाश खंदारे, दिलीप सावतकर, सक्षम उबारे, रोहन जोगदंड, शौर्य जोगदंड, धनंजय चौदंते, श्रेयस गायकवाड, कुणाल गायकवाड यांनी दहा दिवसीय श्रामणेर दीक्षा घेतली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दसशील, भीक्षापात्र व चिवर प्रदान करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना त्रीसरण पंचशील देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चक्रधर राजेगोरे, कपिल गच्चे, गंगाधर ढवळे, कमलाकर नरवाडे, उमाजी नरवाडे, आप्पाराव नरवाडे, अनिता नरवाडे, माधव कांबळे, विकास ढवळे, विलास ढवळे, राहूल गोडबोले आदिंनी प्रयत्न केले.