आमच्या घराच्या खिडकीत काही दिवसांपूर्वी रोज एक चिमणी चकरा मारायची,नंतर गवताची एक एक काडी आणून घरटं विणू लागली, सात आठ दिवसांत चिमणीण आखीव रेखीव , दाटसर घरटं बांधलं, खिडकीच्या परिघातचं तिची भ्रमंती अजूनही आहे, तिला भीती वाटू नये म्हणून आम्ही ती खिडकीच उघडली नाही, आपल्या घरटयाच्या देखरेखी साठी अधून मधून खिडकीच्या लोखंडी ग्रीलवर बसून जणू तिचं पाहरा देणंच चालू आहे, खिडकीच्या आतल्या काचातुन मी हळुच न आवाज करता माझ्या अडीच वर्षाच्या मृणाल ला चिमणीचा खोपा तयार करताना दाखवलं, तिच्या डोळ्यात कमालीचं कुतूहल दिसलं..अन् मोठ्या उत्सुकतेने मृणाल चिमणीला पाहू लागली, चिमणीच्या हलचाली प्रमाणे तिच्याही डोळ्यांच्या बाहुल्या इकडे तिकडे फिरवू लागली, ऐरव्ही मी तिला चिऊ…चिऊ.. ये….चारा खा…पाणी पी..भुर्रकन उडून जा ..असं गाणं अभिनयसह करून घेई पण चिऊ आज मला तिला प्रत्यक्ष दाखवता आली…याचा एक आई म्हणून मला कमालीचा आनंद झाला.
पक्षी प्रजातीतील चिमणी सर्वांना माहिती असलेला जगातील लोकप्रिय पक्षी , सर्वात जास्त परिचय असलेला पक्षी , लहानांपासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येकालाच चिमणी परिचयाची आणि जिव्हाळ्याची असते.अगदी पक्षी म्हणजे काय यातलं काहीही कळत नसेल तरी चिमणी ही प्रत्येकाच्या अगदी लहानपणापासून भावविश्वात येते ….तिची पहिली ओळख होते ते चिऊ काऊ च्या गोष्टीतून , चिऊ चिऊ ये…. चारा खा …पाणी पी..या बडबडगीतून, हल्ली पूर्वी इतक्या चिमण्यांच दिसत नाहीत, माझ्या लहाणपणची चिमण्यां संदर्भातील एक आठवण आहे, ती अशी की, आमच्या घरी एक मोठा आरसा लटकवलेला होता , त्याला रोज सकाळी चिमण्या चोची मारून जात, कितीही त्यांना हुसकावून पाठवण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा येत…, मला लहानपणी नेहमी वाटायचं , मी जशी शाळेला जाण्यासाठी आरशात बघून तयार होते आहे तशीच ही चिमणी ही आरशात स्वतः ला बघायला येत असेल, तेंव्हा चिमण्या तारेवर रांगेत खुप साऱ्या बसायच्या, तेंव्हा आम्ही त्यांना चिमण्यांची शाळा भरली म्हणायचो, पण तेंव्हा नेमक्या कोणत्या चिमण्या माझ्या घरी यायच्या हाच प्रश्न मला नेहमी पडत, पण चिमणी माझी मनानं जवळ आलेली पहिली जिवाभावाची मैत्रीण , आमची रोज सकाळी शाळेसाठी तयार होताना भेट व्हायची ,आम्ही दोघीही शाळेत जायचो नं, आम्ही वर्गात रांगेत बसायचो अन् चिमण्या पोलवरच्या तारेवर रांगेत बसायच्या…. माझ्या वडिलांना नेहमी गोष्ट सांगा असं म्हणत , ते मला नेहमी सांगत…पण ते तरी रोज किती दिवस मला नवीन गोष्टी सांगणार …. शेवटी माझ्या बाल हट्ट पूरवित म्हणत, “एक होती चिमणी.. तिच्या पायात होते चांगचिंग… नको बाबा नाहीतर कुणाला सांगशील…..” मग मी तीच गोष्ट मी माझ्या मैत्रिणींना सांगायचे, आता शिक्षिका असताना याच चेतक बदल म्हणून वापर करते, मला लहानपणी ची एक गोष्ट आठवते, चिऊताई चिऊताई दार उघड.. “थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे..” ही गोष्ट अनेकांच्या प्राथमिक बाल गोष्टीत नक्कीच असणार..
‘ चिमणी’ हा शब्द लहान मुलांना विशेषतः मुलींसाठी लाडाने ,मायेन वापरतो , माझी चिमणी… माझी चिऊ अशी प्रत्येकाच्या बालपणात , भावविश्वास चिमणी ची जागा नक्कीच अढळ असणार, यात शंकाच नाही.
आता शहरात पूर्वी इतक्या चिमण्या दिसत नाहीत ,आपल्या मुलांना या चिमण्या आपल्या इतक्या दिसत नाहीत, चिऊताई ये चारा खा … पाणी पे… भुर्रकन उडून जा … आपण अस म्हणायचो खरं….. म्हणूनच तर उडून गेली नाही ना चिमणी … आपण सारे चिमण्या पाहण्यापेक्षा विकासाच्या गोष्टीत जास्त रस घेताना दिसत असल्यामुळे कदाचित पुढच्या पिढ्यांना चिमणी माहीत असेलच किंबहुना त्यांच्या भावविश्वत इतक्या महत्वाच्या स्थानी असेलच असे ठामपणे सांगता येणार नाही, हा भाग वेगळा.
आपल्या भारतात चिमणीच अस्तिव अगदी पुरातन युगाच्या ही आधीपासून दिसून येते, युरोप आशिया खंडामध्ये जसजसा शेतीचा प्रसार होत गेला तसतशी चिमणी पृथ्वी तलावरच्या दूरदूरच्या प्रदेशात पोहचली, एकोणिसाव्या शतकात चिमणीला न्युयार्क मध्ये बगीच्यात अळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून नेले अन चिमणी अमेरिकेतही स्थिरावली , या तिच्या सर्वत्रिकीकरणामुळे तिने मानवाच्या साहित्यात , संस्कृतीत, अगदी जगभरातील बालगीतांमध्ये स्थान प्राप्त केले आहे, ते उगाच नाही.
आता अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, घटते वनक्षेत्र , मोबाईल चे टॉवर त्यातील किरणांच्या प्रभावामुळे चिमण्यांचे जीवन धोक्यात येत आहे.कारखान्यातील चिमणी प्रमाणाबाहेर धूर ओकू लागली, तेंव्हा आपली ही चिमणी दूर निघून जाऊ लागली.या परिस्थितीचा विचार करून अनेकांकडून चिमणी वाचवा चे अनेक प्रयत्न दिसून येत आहेत, भारतातील नाशिक मधील nature forver socity फ्रान्स मधील एकोसिस अकॅशन फौंडेशन या संस्थांनी इतर असंख्य स्वयंसेवी संस्था सोबत या बाबींचा विस्तृत अभ्यास केला, चिमण्यांची घटती संख्या हे वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचे लक्षण आहे काय हे शोधण्यासाठी जगभर चळवळ उभारत आहेत, दोन हजार पंधरा सालची चिमणी दिवसाची संकल्पना होती, I Love sprrow तसेच दिल्ली महापालिकेने चिमणी हा तेथील राज्य पक्षी जाहीर केला आहे, दोन हजार दहा पासून हा जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे, अनेक शाळांमधून अगदी काही घरांमधून ही चिमणी वाचविण्यासाठी त्यांना धान्य पाणी ठेवण्यापासूनचे प्रयत्न होताना दिसत आहेत, पण यासाठी खुप व्यापक प्रमाणात सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत, वीस मार्च जागतिक चिमणी दिवस या निमित्ताने आपणही आपल्या परीने चिमण्यांची संख्या वाढवण्याचा आपल्या परिसर क्षेत्रापुरता का होईना प्रयत्न करू या ..आपल्या पुढच्या पिढीला चिमणी दिसावी किमान म्हणताना….
” चिऊ…चिऊ…ये ।”
अनिता दाणे जुंबाड
7775830740
खूप छान.
संवेदनशील
नि प्रवाही.
आवडलं..
thanks