कंधार ; युगसाक्षी वृत्तसेवा
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीच्या काळात पाच किंवा पाचपेक्षा जास्त माणसे एकत्रित येण्यास बंदी केली असताना गुरुवारी दि.२५ रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत आपण आगारात शंभर कर्मचाऱ्यांना एकत्रित जमवून या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबत आपणास ५० हजार रुपये दंड का आकारण्यात येऊ नये. याबाबत २४ तासाच्या आत खुलासा करावा. अन्यथा या अपराधास पात्र ठरवण्यात येईल, अशी कारणे दाखवा नोटीस तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी आगारप्रमुख ठाकूर यांना दि.२५ मार्च रोजी बजावली आहे.
पत्रकार हफीज घडीवाला यांनी आगारातील कर्मचाऱ्यांची म्हणणे ऐकून घेवून तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना आगारात येण्यास भाग पाडले त्यामुळे आगारातील कर्मचाऱ्यांनी पत्रकार हफीज घडीवाला यांचे आभार मानले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यामध्ये एसटी बस सुद्धा बंद ठेवण्यात आल्या. परंतु कंधार आगारप्रमुखांनी आगारातील सर्वच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे फर्मान काढल्याने गुरुवारी दि.२५ रोजी आगारात गोंधळ उडाला. त्याची दखल घेऊन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी आगारात येऊन आगारप्रमुखांना फैलावर घेत गर्दी जमविल्या प्रकरणी कानउघडणी केली व ५० हजाराच्या दंड बाबत नोटीस बजावली.
संचारबंदी लागू असताना आणि बस सेवा बंद ठेवलेली असताना आगार प्रमुख ठाकूर यांनी आगारातील
तीनशेच्यावर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे विना स्वाक्षरीचे आदेश काढले. कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात रोज यावे आणि स्वाक्षरी करून चार तास आगारात बसावे, असे फर्मान आदेशात नमूद केले आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून आगारात वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्यांना बोलवल्याने एकच गर्दी झाली. ही बाब पत्रकार दैनिक सकाळ हफीज घडीवाला यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तहसीलदार मुंडे आगारात आले. त्यावेळी आगारप्रमुख नव्हते. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा केला असता आगारप्रमुखांनी प्रयत्न केला असता आगारप्रमुखांनी उत्तर दिले नाही.