ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशकं मराठी तसेच देशवासियांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्यांची गीतं तेवढ्याच तन्मयतेने आणि अभिरूचीने ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली.
आशा भोसले यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गाण्याला पोसलं. मराठी तसेच हिंदी गीतांना त्यांच्या आवाजामुळेच एक नवी उंची मिळाली. त्यांच्या संपूर्ण हयातीत त्यांनी अनेक सदाबहार गीतं चित्रपटसृष्टी आणि रसिकांना दिली. त्यांनी गायलेलं ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’ हे गीत आजही अनेकांना जवळचं वाटतं.
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारत सरकारच्या मानाच्या अशा पद्म विभूषण पुरस्कारानेसुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारनेसुद्धा त्यांचा गौरव करण्यात आला.
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. आशा ताईंनी आतापर्यंत १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा ताई ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुर आणि त्यानंतर मुंबईत आलं. कुटुंबाच्या मदतीसाठी आशा आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांनी सिनेमांत गाणं गायला सुरुवात केली.
आशाताई यांनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी रसिकांपर्यंत पोहोचलंच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं होतं. तरुण गायकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
५ मे २००८ रोजी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. २००० मध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आशा भोसले यांनी सातवेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे तर १८ वेळा त्यांना नामांकनही मिळालं आहे. याशिवाय दोनवेळा आशाताईंना त्यांच्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
२०१५ च्या बीबीसीच्या १०० इन्स्पायरिंग वुमनमध्ये आशा भोसले यांचं नाव होतं.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘आशाताईंचा आवाज जसा कायमचा स्मरणात राहील, तशीच ही बातमीही कायम लक्षात राहील,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करून आशा भोसले यांचं अभिनंदन केलं असून राज्य सरकारचेही आभार मानले आहेत. ‘आशाताई यांचा आवाज, त्यांची गाण्याची लकब, भावगीतांसाठी त्यांचे योगदान या सगळ्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या आहेत. मोठ्या झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही म्हणतात. लतादीदींसारख्या थोर व्यक्तींच्या भगिनी असल्याने आपले स्वतंत्र अस्तित्व तयार करणे अतिशय अवघड गोष्ट होती. पण आशाताईंनी अतिशय कष्ट घेऊन संगीत क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि या क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांना महाराष्ट्र सरकारनं आज सन्मानित केलं ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी आशाताईंचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला धन्यवाद देतो,’ असं पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संगीताच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंबीयांचे ऐतिहासिक योगदान आहे. सर्वच मंगेशकर बंधु-भगिनींनी या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. लता दीदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा अभिमान प्रत्येकाला आहे, तसाच अभिमान आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वांना वाटेल,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण माहाराष्ट्रातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. संगीत तसेच गायण क्षेत्रातील अनेक मान्यवारांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आशा भोसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गंगाधर ढवळे ,नांदेड
संपादकीय
२७.०३.२१